मलकापुरात २६ जणांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST2021-03-28T04:36:53+5:302021-03-28T04:36:53+5:30
मलकापूर : कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी एक विशेष मोहीम राबवली. पोलीस पथकाकडून शहरात फिरणारे, मास्क न लावलेल्या २६ ...

मलकापुरात २६ जणांवर दंडात्मक कारवाई
मलकापूर : कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी एक विशेष मोहीम राबवली. पोलीस पथकाकडून शहरात फिरणारे, मास्क न लावलेल्या २६ जणांवर दंडात्मक कारवाई केली. शिवछावा चौकात राबवलेल्या या विशेष मोहिमेत १३ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
नगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे.
मलकापुरात कोरोनावर मात करण्यासाठी पुन्हा विविध उपाय सुरू केले आहेत. शासन, पालिकेचे पदाधिकारी, सर्व कर्मचारी, आरोग्य व पोलीस विभागाने रात्रीचा दिवस करून शहराला कोरोनामुक्त केले होते. यामध्ये सातत्य राखण्यासाठी अनेक उपाय वरचेवर राबवले जात आहेत. मात्र काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरात गतीने उपाय सुरू केले आहेत. शहरातील नागरिकांना नियमांची शिस्त लावण्यासाठी शहरात पालिकेने गस्तपथकांची नेमणूक केली आहे. तर पोलीसही नियम मोडणाऱ्यांसाठी कठोर कारवाई करत आहे.
पोलीस पथकाने शनिवारी शहरात मास्क न वापरता फिरणाऱ्या २६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी ५०० रुपयेप्रमाणे १३ हजार रुपये दंड वसूल केला. अशी दंडात्मक कारवाईची मोहीम वारंवार राबवावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. मोहिमेत कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
चौकट
नाक-तोंड मोकळंच.. मास्क गळ्यात
कोरोनावर मात करण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे. सामाजिक अंतरासह मास्क लावणे असे अनेक नियम बंधनकारक केले आहेत. मास्क न घालता फिरणाऱ्यांवर पालिकेचे पथक कारवाई करते. मास्क घालणे बंधनकारक असतानाही बहुतांश नागरिक नाक-तोंड मोकळंच ठेवून मास्क शोसाठी गळ्यातच अडकवत आहेत.
चौकट
पोलिसांना चकवा देत दुचाकी सुसाट
दुचाकीवरून मास्क न घालता फिरण्यास मनाई आदेश आहे. परिस्थिती पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेच्या उंंबरठ्यावर आहे. त्यामुळे शनिवारी शहर पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला. विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस शहरात अनेक ठिकाणी अशी कारवाई करत असतानाही अनेक दुचाकीस्वार पोलिसांना चकवा देत दोघे-दोघे तर काही जण तिघे-तिघे विनामास्क बसून सुसाट जातात. त्यामुळे कोरोनाची भीतीच नसल्याचे चित्र दिसत आहे.