वडूजमध्ये १०३ वाहनांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:05+5:302021-01-08T06:08:05+5:30

वडूज : खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सोमवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, तहसील कार्यालय परिसरात नो ...

Punitive action on 103 vehicles in Vadodara | वडूजमध्ये १०३ वाहनांवर दंडात्मक कारवाई

वडूजमध्ये १०३ वाहनांवर दंडात्मक कारवाई

वडूज : खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सोमवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, तहसील कार्यालय परिसरात नो पार्किंग झोन असल्यामुळे अनेकांनी वडूज बसस्थानक व इतरत्र वाहने लावली. त्यामुळे वडूज पोलिसांनी १०३ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी २४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.

याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील १४२ गावांपैकी ९० गावांमध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणूक मतदानानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने अनेक दिग्गज नेतेमंडळींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून ते छाननी, अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपर्यंत वाहनांच्या अलोट गर्दीने वडूज परिसराला एकप्रकारे वेढाच दिला होता. तहसील कार्यालय परिसरात वाहनांना बंदी केल्यामुळे वाहने रस्त्याच्या दुतर्फा व पंचायत समिती परिसरात दिवसभर उभी करण्यात आली होती. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेवेळी वाहन लावण्यास वाहनधारकांना अनेक अडचणी येत होत्या. त्यात तालुक्यातील ग्रामीण भागातून वडूज आगाराच्या एसटीचे वेळापत्रक जाहीर नसल्याने बोटावर मोजण्याइतक्याच एसटी बसेस दिसायच्या. त्यामुळे भले मोठे पटांगण मिळाल्याने वाहनधारकांनी वडूज बसस्थानकाचे वाहनतळच केले. एकापाठोपाठ एक अशा एकूण १०३ वाहनधारकांनी वडूज बसस्थानकाचा आधार शोधला.

वडूज आगारातील कर्मचाऱ्यांनी बसस्थानकातील आत-बाहेर गेटवरच एसटी बसेस आडव्या लावून वडूज पोलीस ठाण्याशी संपर्क केला. सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, वाहतूक नियंत्रण कर्मचारी व होमगार्ड यांनी बसस्थानक परिसरातील अवैध वाहनतळ केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून २४ हजार ४०० रुपये वसूल केले. या कारवाईमुळे सर्वसामान्य लोकांतून व वडूज आगारातील चालक-वाहक यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे.

फोटो : ०४वडूज-कारवाई

वडूज बसस्थानकात सोमवारी शेकडो वाहने लावण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. (छाया : शेखर जाधव)

Web Title: Punitive action on 103 vehicles in Vadodara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.