मलकापूर : मलकापुरात भला मोठा कंटेनर खड्ड्यात अडकल्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग एक तास ठप्प झाला. नांदलापूर हद्दीत भराव पुलाशेजारी रविवारी दुपारी ही घटना घडली. यामुळे खड्डे बुजवण्यात होणारा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अपघातानंतर मलकापुरात पुणे-कोल्हापूर लेनवर तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पुणे-बंगळुरू महामार्गावर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. महामार्गाचे काम सुरू असल्याने बहुसंख्य वेळा वाहनचालकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. या कामासाठी विविध कारणांनी खोदलेले खड्डे व्यवस्थित न बुजवल्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत.गॅस पाइपलाइन टाकणाऱ्या कंत्राटदारानेही भल्या मोठ्या चरी खोदून काम केले आहे. अशा प्रकारचे खड्डे व्यवस्थित न बुजवल्यामुळे ठिकठिकाणी ते आरत आहेत. महामार्गावरील अवजड वाहने अशा ठिकाणाहून गेली असता मोठी वाहने अडकत आहेत. त्याच पद्धतीने रविवारी एका खड्ड्यात भला मोठा कंटेनर अडकला. त्यामुळे नांदलापूर ते कोल्हापूर नाक्यापर्यंत तब्बल एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला.महामार्ग कर्मचाऱ्यांनी कंटेनर काढण्याचा प्रयत्न केला तरी तो अवजड असल्यामुळे निघत नव्हता. अथक परिश्रमांनी तब्बल एक तासानंतर हा कंटेनर बाहेर काढण्यात यश आले. यानंतर महामार्गावर झालेली वाहतूक सुरू झाली. तरीही ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी दीड ते दोन तासांचा अवधी गेला. महामार्ग पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
Satara: मलकापुरात कंटेनर खड्ड्यात अडकल्याने महामार्ग तीन तास ठप्प, खड्डे बुजवण्याचा भोंगळ कारभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:16 IST