‘जादूटोणाविरोधी कायदा : प्रशिक्षण कार्यक्रम’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:41 IST2021-08-26T04:41:38+5:302021-08-26T04:41:38+5:30
पुसेगाव : ‘जादूटोणाविरोधी कायद्यामध्ये डॉक्टरेट मिळवणारे पहिले प्राध्यापक डॉ. विलास खंडाईत यांच्या ‘जादूटोणाविरोधी कायदा : प्रशिक्षण कार्यक्रम’ या पुस्तकाचा ...

‘जादूटोणाविरोधी कायदा : प्रशिक्षण कार्यक्रम’ पुस्तकाचे प्रकाशन
पुसेगाव : ‘जादूटोणाविरोधी कायद्यामध्ये डॉक्टरेट मिळवणारे पहिले प्राध्यापक डॉ. विलास खंडाईत यांच्या ‘जादूटोणाविरोधी कायदा : प्रशिक्षण कार्यक्रम’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ लोकायत प्रकाशनाच्या वतीने गुरुवार, दि. २६ ऑगस्ट रोजी ऑनलाइन होत आहे.
पुणे येथील विभागीय समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार असल्याची माहिती प्रकाशक राकेश साळुंखे यांनी दिली.
२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर दि. २६ ऑगस्ट २०१३ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जादूटोणाविरोधी कायद्यासंदर्भातील अधिकृतपणे अधिसूचना काढली होती. या दिवसाचे औचित्य साधून नेमक्या त्याच विषयावरील सविस्तर मांडणी करणारे महाराष्ट्रातील पहिले पुस्तक तेही डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कार्यभूमीतून प्रकाशित होतेय, हे एका अर्थाने दाभोलकरांना अभिवादनच होय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्येनंतर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील डॉ. विलास खंडाईत यांची पीएच.डी. आणि त्यांचा प्रबंध हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या धाडसाबद्दल सर्वत्र कौतुक आणि कौतुक होत होते. त्यांनी लिहिलेल्या जादूटोणाविरोधी कायदा : प्रशिक्षण कार्यक्रम या पुस्तकामुळे जनसामान्यांना कायदा समजण्याबरोबरच, सर्व पातळ्यांवर प्रबोधनाचे कार्य सुकर होणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रातील कायद्याच्या अनुषंगाने असणारे शासनाचेच महत्त्वाचे कार्य या पुस्तकाने गतिमान होणार आहे, असे असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.