पाटण तहसील कार्यालयात जनतेची लूट
By Admin | Updated: November 9, 2014 23:28 IST2014-11-09T22:35:13+5:302014-11-09T23:28:36+5:30
हात ओला केल्यासच काम : सर्वसामान्य जनतेला केलं जातंय लक्ष्य

पाटण तहसील कार्यालयात जनतेची लूट
पाटण : नुकत्याच आयोजित केलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यक्रमात धडे घेतल्यानंतरही पाटण तहसील कार्यालयाच्या आवारातील पोलीस, दुय्यम निबंधक, स्टॅम्प व्हेंडर, तहसील कर्मचारी, तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेची लूट करत असून, अनेकजण यात बळी पडत आहेत. दाखला किंवा जमीन खरेदी-विक्री व्यवहार असो, पन्नास रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंतची मागणी पूर्ण करावी लागत आहे.
विविध प्रकारचे दाखले, सेतू विभाग, धान्य पुरवठा विभाग, जमीन खरेदी-विक्री व्यवहार किंवा प्रतिज्ञापत्र करायचे असेल तर संबंधित कर्मचाऱ्यांनी केलेली अवाजवी मागणी पूर्ण केल्याशिवाय काम होत नाही, हा अनुभव येथे येणाऱ्या सर्वांनाच आलेला आहे. पोलीस ठाण्यात तर पासपोर्ट असो किंवा चारित्र्य पडताळणी दाखल्याचे काम असो, प्रत्येकाकडून २०० रुपये घेतले जात आहेत. तहसील आवारातील लिखाई काम करणारे तर शासकीय दरपत्रकाकडे दुर्लक्ष करून येणाऱ्या जनतेची लूट करत आहेत. धान्य दुकानदारांकडून दरखेपेस ५०० रुपये घेतले जात आहेत. सेतू विभागात २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतची नोट हातावर ठेवल्याशिवाय दाखल्यांवर सही होत नाही.
हे सर्व लुटीचे प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ज्ञात असतात. मात्र ‘तू खा आणि मला दे’ अशी गत असल्यामुळे ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’असे चित्र दिसत आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचारी तर जनतेला बकरा बनवून ५ ते १० हजारांपर्यंतच्या रकमा वसूल करून ‘मिटवामिटवी’ करत आहेत. याबाबतच्या तक्रारी अनेकांनी पोलीस निरीक्षकांच्या कानावर घातल्या आहेत. ही लूट थांबविण्याची मागणी दुर्गम भागातील ग्रामस्थ करीत आहेत. (प्रतिनिधी)
तालुक्यातील जनतेला शासकीय कार्यालयात येणारा वाईट अनुभव आणि होणारी आर्थिक पिळवणूक यासाठी आता नवीन आमदारांनी पुढाकार घ्यावा. तशा सूचना पोलीस, महसूल, पंचायत व खास करून दुय्यम निबंधकांना द्याव्यात. तरच गैरव्यवहारांना आळा बसेल.
- रवींद्र घोरपडे, हुंबरणे, ता. पाटण
तालुक्यातील प्रशासन लोकाभिमुख करणार, असे नवनियुक्त आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. त्यानंतर आमदारांनी अधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच घेतली. मात्र जनतेला लुटणाऱ्यांमध्ये फरक पडलेला दिसत नाही.