म्हैसाळ थकबाकीप्रकरणी न्यायालयात जनहित याचिका
By Admin | Updated: October 11, 2015 00:13 IST2015-10-11T00:12:19+5:302015-10-11T00:13:07+5:30
राष्ट्रवादीचा निर्णय : थकबाकी माफ न झाल्यास आंदोलन

म्हैसाळ थकबाकीप्रकरणी न्यायालयात जनहित याचिका
मिरज : म्हैसाळच्या थकबाकीचा बोजा शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. टेंभू योजना कृती समितीचे अॅड. बाबासाहेब मुळीक, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी म्हैसाळची थकबाकी माफ करावी, यासाठी जनआंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
अॅड. मुळीक म्हणाले, जिल्ह्याच्या दुष्काळी भागात टेंभू, ताकारी, म्हैसाळ या जलसिंचन योजना सुरु ठेवण्यासाठी वीजबिल ही समस्या आहे. योजनांना कायमस्वरुपी विद्युतपुरवठा सुरु राहण्यासाठी दुष्काळी भागात पवन व सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावेत. अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा किंवा ठराव करण्यात येतील. पवन व सौर ऊर्जेमुळे टेंभू ताकारी व म्हैसाळ योजना कायम सुरु राहणार असल्याचे अॅड. मुळीक यांनी सांगितले. बाळासाहेब होनमोरे यांनी म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे योग्य नियोजन नसताना चाचणीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेल्या पाणीबिलाची आकारणी चुकीची आहे. पाणीबिलाची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर कर्ज म्हणून नोंद करणे अन्यायी आहे.
या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनआंदोलन व उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे होनमोरे यांनी सांगितले. चुकीची पाणीपट्टी आकारणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटलेही दाखल करण्यात येणार असल्याचे होनमोरे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, तानाजी दळवी, गंगाधर तोडकर उपस्थित होते. (वार्ताहर)