पाडळीत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST2021-09-12T04:45:24+5:302021-09-12T04:45:24+5:30
नागठाणे : नागठाणे परिसरातील तीर्थक्षेत्र पाडळी (ता. सातारा) गावामध्ये यंदा गणेशोत्सव साजरा न करता प्रशासनास सहकार्य केले आहे. ग्रामस्थांनी ...

पाडळीत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रम रद्द
नागठाणे : नागठाणे परिसरातील तीर्थक्षेत्र पाडळी (ता. सातारा) गावामध्ये यंदा गणेशोत्सव साजरा न करता प्रशासनास सहकार्य केले आहे. ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दुष्परिणामांचे महत्त्व समजून बोरगाव पोलीस स्टेशनच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन गावातील सर्व मंडळांनी यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रम साजरा न करण्याचा निर्णय घेऊन पंचक्रोशीतील गावांपुढे एक मोठा आदर्श ठेवला आहे.
नागठाणे परिसरातील तीर्थक्षेत्र पाडळी हे जवळजवळ साडेचार हजार लोकसंख्येचे गाव. या गावामध्ये शंभू महादेव मित्रमंडळ, द ग्रेट मराठा मित्र मंडळ, देवजी पाटील युवा सांस्कृतिक मंडळ, ज्योतिर्लिंग षष्ठी मित्र मंडळ, सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट मंडळ तसेच श्री भैरवनाथ सांस्कृतिक मंडळ अशी प्रमुख सार्वजनिक मंडळे आहेत. दरवर्षी या सर्व मंडळांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु मागील वर्षापासून संपूर्ण देशात आलेल्या कोरोना या संकटमय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे यंदा बोरगाव पोलीस स्टेशनकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जनजागृती करून सभा घेण्यात आल्या. सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सर्व मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्य तसेच गावच्या सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रम पूर्णतः रद्द करून फक्त घरोघरी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून अत्यंत साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.