कुडाळमध्ये पुन्हा एकदा जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST2021-05-03T04:33:20+5:302021-05-03T04:33:20+5:30
कुडाळ : ‘ब्रेज द चेन’ यानुसार सध्या राज्यात वाढत्या कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदीचे व जमावबंदीचे ...

कुडाळमध्ये पुन्हा एकदा जनता कर्फ्यू
कुडाळ : ‘ब्रेज द चेन’ यानुसार सध्या राज्यात वाढत्या कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदीचे व जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू असून, जावळी तालुक्यातील वाढणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ ग्रामपंचायतीच्या प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी ०३ ते १० मे या कालावधीत जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. याअगोदरही गेल्या आठवड्यात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला होता.
कुडाळ ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने आठ दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या कालावधीत केवळ औषध व दवाखाना सोडून इतर सर्व दुकाने, भाजीपाला विक्री, बंद राहणार आहेत.
गेल्या काही दिवसांत जावळीत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कुडाळ हे तालुक्यातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्याने परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठीच या जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. येथील व्यापारी व ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निश्चित याचा उपयोग होणार आहे.
चौकट :
कुडाळची यात्राही रद्द
दरवर्षी मोठ्या उत्साहात कुडाळ येथील श्री पिंपळेश्वर-श्री वाकडेश्वर देवतांची यात्रा होत असते. यावर्षी मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा उत्सवही होणार नाही. यामुळे ५ व ६ मे रोजी होणारी येथील श्री पिंपळेश्वर-श्री वाकडेश्वर देवतांची यात्राही यावर्षी रद्द करण्यात आली आहे. यामुळे कोणीही मंदिर परिसराकडे जाऊ नये. आपण सर्वांनीच आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. घरी सुरक्षित राहून कोरोनापासून दूर राहावे.