व्याघ्रसंवर्धनासाठी जनजागृती महत्त्वाची
By Admin | Updated: December 29, 2014 00:04 IST2014-12-28T22:03:11+5:302014-12-29T00:04:38+5:30
अभिनव देशमुख : ‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ रॅलीचे उत्साहात स्वागत

व्याघ्रसंवर्धनासाठी जनजागृती महत्त्वाची
सातारा : ‘वाघांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी डेक्कन अॅडव्हेंचर आणि टायगर कॉन्झर्वेशन अॅन्ड रिसर्च सेंटर प्रयत्न करत आहेत ही चांगली बाब आहे. त्यांना तरुण पिढीची साथ मिळत आहे. परंतु ज्या ठिकाणी वाघांचा अधिवास आहे त्या परिसरातील सर्वसामान्यांची वाघ कशासाठी वाचवला पाहिजे, याबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे,’ असे मत पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले.
मुंबई येथील डेक्कन अॅडव्हेंचरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ या मोटरसायकल रॅलीचा समारोप जिल्हा बँकेच्या किसनवीर सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. डेक्कन अॅडव्हेंचरचे जगदीश होळकर, ‘टीसीआरसी’चे प्रसाद हिरे आणि जिल्हा सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर उपस्थित होते.
रॅलीचा समारोप येथील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे उपस्थित होते. रॅलीत ७५ तरुण, २१ तरुणी आणि इतर ५० जण सहभागी झाले. रॅली मुंबई-खोपोली, वाईमार्गे साताऱ्यात आली. वाघ वाचवणे का गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. (प्रतिनिधी)