साताऱ्यासाठी निधीची तरतूद करा
By Admin | Updated: March 3, 2016 00:02 IST2016-03-02T22:26:50+5:302016-03-03T00:02:06+5:30
उदयनराजे भोसले : मुख्यमंत्र्यांना निवेदन, मुंबई येथील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

साताऱ्यासाठी निधीची तरतूद करा
सातारा : ‘साताऱ्याचे मंजूर असलेले; परंतु रखडलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मसूर, वाठार, रहिमतपूर आदी ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग ओव्हरब्रिज, पोवई नाका उड्डाणपूल तसेच कोंडवे ते सातारा, गोडोली, अजंठा चौक आणि गोडोली ते शिवराज पेट्रोल पंप अखेर रस्ते सुशोभीकरण या कामांकरिता राज्याच्या अंदाजपत्रकात भरीव निधीची तरतूद करावी, सातारा शहर आणि उपनगरांसाठी नवीन कण्हेर उद्भव योजना मंजूर करावी, नगरपरिषदेला राज्याकडून विशेष बाब म्हणून ११ कोटींचे रस्ता अनुदान प्रदान करावे,’ अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांची मुंबईत मुख्यमंत्री कक्षात भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, अॅड. जे. एस. राजेभोसले, अशोक सावंत, संजय शिंदे, प्रताप शिंदे आदी उपस्थित
होते.
उदयनराजे भोसले यांनी प्रत्येक प्रश्नाबाबत सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘राज्याचा अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्याला झुकत माप देणे अत्यंत गरजेचे आहे. हा जिल्हा राज्याला वीज पुरवतो.
स्वातंत्र्यसैनिक आणि आजी-माजी सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा ओळखला जातो. याची राज्य सरकारने जाणीव ठेवून राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील विकासकामांबाबत निधीची तरतूद केली पाहिजे, साताऱ्याला वैद्यकीय महाविद्यालय आम्ही मंजूर करून घेतले, त्यासाठी शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालय स्वतंत्रपणे सलग्न केले; परंतु मेडिकल कॉलेज उभारणीचा मुहूर्त काही राज्य सरकारला सापडत नाही, विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे एक वर्ष वाया गेले. बांधकामासाठी कृष्णा खोऱ्याची जमीन अधिग्रहण करायची आहे, ही कार्यवाही तातडीने होऊन उभारणीचा शुभारंभ लवकर होणे गरजेचे
आहे.
सातारा शहराच्या विकासाच्या दृष्टीने पोवई नाक्यावर उड्डाणपूल उभारणीचा सर्व्हे झाला आहे. पूल उभारणीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधी तरतूद करावी, कण्हेर उद्भव पाणी योजनेला तातडीने मंजुरी मिळावी, रस्त्यांसाठी एकूण ११ कोटींचे खास बाब म्हणून विशेष अनुदान सातारा नगरपरिषदेला प्रदान करावे, सातारा लोकसभा मतदार संघातील रेल्वे क्रॉसिंग असलेल्या वाठार, रहिमतपूर, मसूर आदी ठिकाणी रोड ओव्हरब्रिज निर्माण करावे, याकरिता अर्थसंकल्पात निधी तरतूद करावी आदी मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
आहे. (प्रतिनिधी)
मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावणार!
या चर्चावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल कॉलेजचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याची ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांना दिली. तसेच महसूल मंत्री, आरोग्य मंत्री यांच्याशी मेडिकल कॉलेजबाबत दूरध्वनीवरून चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी सूचना देखील केल्या.