नारायण राणे यांच्यावरील कारवाईचे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:41 IST2021-08-27T04:41:44+5:302021-08-27T04:41:44+5:30
वाई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने सूडबुद्धीने अटक करून हुकूमशाहीचा नमुना जनतेला दाखविला आहे तर शिवसेनेच्या ...

नारायण राणे यांच्यावरील कारवाईचे निषेध
वाई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने सूडबुद्धीने अटक करून हुकूमशाहीचा नमुना जनतेला दाखविला आहे तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला करून मनमानी कारभार करीत असल्याचे दाखवून दिले आहे.
जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याच्या निषेधाचे कारण पुढे करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात हैदोस घातला आहे व त्याचे समर्थन स्वतः राज्याचे मुख्यमंत्री करीत आहे, हे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम चालू आहे. त्याचा वाई तालुका भाजपा जाहीर निषेध करीत असून, तशा आशयाचे लेखी निवेदन तहसीलदार रणजित भोसले यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, राज्यात भाजपच्या कार्यालयांची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांची चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात यावी तरच जनतेचा कायदा सुव्यवस्थेवर विश्वास बसेल, तसेच मुख्यमंत्र्यांचा सत्तेचा गैरवापर करण्याच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे, जर चुकीच्या वक्तव्य केल्याने नारायण राणेंना अटक होत आहे, तर मग अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मंगळवार दिवसभर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते नारायण राणेंवर टीका करीत आहेत, त्यांनाही अटक झालीच पाहिजे, अन्यथा वाई तालुका भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन उभारेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर भाजपचे शहराध्यक्ष राकेश फुले, जिल्हा सरचिटणीस यशवंत लेले, सचिन गांधी, नाना डोंगरे, शुभदा नागपूरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.