वाईतील जलतरण तलावाच्या संरक्षक भिंती झुडपांच्या गर्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:03+5:302021-02-13T04:38:03+5:30
वाई : अनेक अडचणींतून मार्ग काढत वाई नगरपालिकेचा जलतरण तलाव पूर्ण झाल्याने वाईकरांना पोहण्यासाठी एक पर्वणी निर्माण झाली; परंतु ...

वाईतील जलतरण तलावाच्या संरक्षक भिंती झुडपांच्या गर्तेत
वाई : अनेक अडचणींतून मार्ग काढत वाई नगरपालिकेचा जलतरण तलाव पूर्ण झाल्याने वाईकरांना पोहण्यासाठी एक पर्वणी निर्माण झाली; परंतु या जलतरण तलावाला समस्यांचे ग्रहण लागले आहे. तलावाच्या भिंतींवर झाडा-झुडपांचे साम्राज्य वाढले असून, या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
राज्यातील ३८४ नगरपालिकांपैकी वाई नगरपालिकेकडून सेमी ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलाव तयार करण्यात आला. कोरोना काळात हा जलतरण तलाव बंद राहिल्याने तो पुन्हा सुरू करताना अनेक समस्या निर्माण झाल्या. जलतरण तलावाच्या संरक्षक भिंतीवर विविध प्रकारच्या झाडा-झुडपांचे साम्राज्य वाढल्याने संपूर्ण तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या झुडपांमुळे भिंतीला तडे जाऊन भेगा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शहरात इतर कुठेही पोहण्याची व्यवस्था नसल्याने सर्व मदार याच जलतरण तलावावर आहे. कृष्णेच्या पाण्यात पूर्वी पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असे. आता या नदीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे त्यात पोहण्याचे धाडस कोणी करत नाही. त्यामुळे प्रशासनाने भिंतीवर वाढलेली झाडे त्वरित हटवून जलतरण तलावाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
(कोट)
जलतरण तलाव वाई शहराच्या वैभवात भर घालत आहे. प्रशासनाकडून तलाव व संरक्षक भिंतीची पाहणी करण्यात आली आहे. दुरुस्ती व स्वच्छतेबाबत पालिकेकडून योग्य ते नियोजन केले जाईल.
- विद्यादेवी पोळ, मुख्याधिकारी
फोटो : १२ वाई
वाई येथील जलतरण तलावाच्या भिंतीवर झाडा-झुडपांचे साम्राज्य वाढले असून, भिंतीला धोका निर्माण झाला आहे. (छाया : पांडुरंग भिलारे)