कारागृह अन् पोलीस ठाण्याला फाटकाचे संरक्षण
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-01T21:44:20+5:302015-01-02T00:21:22+5:30
जमाव थोपविण्यासाठी उपाय : पोलीस ठाण्यातील वर्दळीला बसणार पायबंद

कारागृह अन् पोलीस ठाण्याला फाटकाचे संरक्षण
सातारा : एखाद्या आरोपीला बेड्या ठोकून पोलीस ठाण्यात किंवा कारागृहात आणले की त्याच्यामागे येणारा नातेवाइक, समर्थकांचा लोंढा, घोषणाबाजी करत पोलीस अधिकाऱ्यांना घातले जाणारे घेराव, इतकेच नव्हे तर चक्क पोलीस ठाण्यात घुसून आरोपीला केली जाणारी मारहाण अशा विलक्षण घटना फक्त साताऱ्यातच घडू शकतात. शिवाय आरोपीला कारागृहात घेऊन जाताना त्याला पलायन करायला सोयीस्कर अशीच स्थिती जिल्हा कारागृहाजवळ आहे. असे धोके टाळण्यासाठी नवीन बसविलेल्या लोखंडी फाटकामुळे कारागृह आणि शहर पोलीस ठाण्याला संरक्षण मिळाले आहे.
सातारा शहर पोलीस ठाणे आणि जिल्हा कारागृह एकमेकांना चिकटूनच आहेत. शहरात शासन व सुव्यवस्था राखण्यासाठी ज्याठिकाणी निर्णय होतात आणि गुन्हेगारांना शिक्षा म्हणून ज्याठिकाणी डांबून ठेवले जाते अशी ही संवेदनशील जागा सध्या वर्दळीचे ठिकाण बनली होती. काटकोनात बांधलेल्या या इमारतींसमोर मोकळे मैदान आहे. मुख्य रस्त्यापासून सुमारे ५० फुटांवर कारागृहाचे प्रवेशव्दार आहे, तर ५ फुटांवर शहर पोलीस ठाणे आहे. समोर असलेल्या मोकळ्या जागेत पोलीस कर्मचाऱ्यांबरोबच आरोपींना भेटायला आलेल्या नातलगांची वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे वावरण्यासाठी ही जागा अतिशय अपुरी पडते.
आरोपीला कारागृहात आणताना त्याच्या हातात बेड्या असतात. कारागृहाच्या द्वाराजवळ आल्यानंतर त्याच्या बेड्या काढून कारागृहात नेले जाते. अशावेळी त्याच्याबरोबर आलेले नातेवाइक गोंधळ घालतात. आवारात असलेली वर्दळ, नातेवाइकांचा गोंधळ याचा फायदा उठवून आरोपी पलायन करू शकतो. आरोपीने असा प्रयत्न केल्यास त्याला रोखण्यासाठी कोणतीच उपाययोजना नव्हती. यामुळे लोखंडी गेट संरक्षकाची भूमिका बजावणार आहे. (प्रतिनिधी)
एकच व्यक्ती जाणार आत
मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर लोखंडी फाटक बसविण्यात आले आहे. मजबूत लोखंडी जाळी असलेल्या या फाटकाला एकच दरवाजा ठेवण्यात आले आहे. एका वेळी एकच व्यक्ती आत जाऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता आरोपींच्या नातेवाइकांना किंवा समर्थकांना कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाता येणार नाही. शिवाय जमावाला थोपविणे पोलिसांना सोपे होणार आहे.
जमाव राहणार फाटकाबाहेर
काही महिन्यांपूर्वी शहर पोलीस ठाण्यात जमावाने घुसून एकाला मारहाण केली होती. तर दुसऱ्या एका घटनेत एकाला ताब्यात घेतले म्हणून त्याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून गोंधळ माजविला होता. एखाद्या घटनेमुळे प्रक्षोभक झालेला जमाव थेट पोलीस ठाण्यात घुसल्यानंतर त्यांना थोपवून बाहेर काढणे जिकिरीचे बनते. त्यामुळे सध्या उभारण्यात आलेले लोखंडी गेट हे कारागृहाबरोबरच पोलीस ठाण्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.