धनगर समाज आरक्षणासाठी --गोरेंनी ठोकला बारामतीत शड्डू
By Admin | Updated: July 29, 2014 23:02 IST2014-07-29T21:24:20+5:302014-07-29T23:02:50+5:30
उपोषणस्थळी दिला पाठींबा : सकारात्मक तोडग्याचा केला आशावाद

धनगर समाज आरक्षणासाठी --गोरेंनी ठोकला बारामतीत शड्डू
सातारा : बारामती येथे सुरू असलेल्या धनगर समाज आरक्षणाच्या लढाईला माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी पाठिंबा दिला. आदिवासी विभागाकडून प्रस्ताव आल्यानंतर यासंदर्भात सकारात्मक तोडगा निघण्याचा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने गेले काही दिवस बारामती येथे आंदोलन सुरू असून महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी प्रमुख मागणी आहे. या आंदोलनात राज्यभरातील धनगर समाजातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला त्याचबरोबर तरुणाई सहभागी झाली आहे. बारामतीच्या या आंदोलनस्थळी आ. जयकुमार गोरे यांनी भेट दिली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.आ. गोरे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे म्हणून त्यांचा जोरदार लढा सुरू आहे. माण-खटाव तालुक्यातील जनताही या लढ्यात सहभागी होण्यासाठी सदैव पुढे असणार आहे.’
यावेळी अर्जून काळे, दादासाहेब काळे, डी. एस. काळे, चंद्रकांत काळे, शंकर वीरकर, दिगंबर राजगे, लुनेश वीरकर, दादा नारनवर, विजय नारनवर, संजय काळे, उदय काळे, अण्णासाहेब हिरवे, पांडूरंग काळे, चंद्रकांत जानकर त्याचबरोबर माण आणि खटाव तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)