येळीव भेगाळला... ग्रामस्थ चवताळला!
By Admin | Updated: March 9, 2016 01:13 IST2016-03-09T01:10:26+5:302016-03-09T01:13:09+5:30
औंधमध्ये भीषण पाणीटंचाई : खासगी विहीर, कूपनलिकांनी तळ गाठला; तलावात पाणी सोडण्याची मागणी

येळीव भेगाळला... ग्रामस्थ चवताळला!
रशिद शेख -- औंध --औंध गावास पाणीपुरावठा करणाऱ्या येळीव तलावातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे औंधमध्ये भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. येळीव तलावात पाणी सोडावे, अशी जोरदार मागणी होत आहे. येळीव तलावातून मागील दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परिसरातील विहिरींनी व खासगी बोअरवेलने तळ गाठला आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. सद्य:स्थितीत येळीव तलावातील पाणीसाठा पूर्णपणे आटला असून, मागील दोन दिवसांपासून औंधवासीयांना पाणी मिळणे बंद झाले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाई सुरू झाल्याने संपूर्ण उन्हाळा कसा काढायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. येळीव तलावात पाणी सोडण्याची मागणी औंध ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाने लवकर पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.
मार्चमध्येच पाण्यासाठी दाहीदिशा...जलस्रोत आटले : खटाव-माण-फलटण भागातील स्थिती
सातारा : उन्हाळ्याचे मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने बाकी आहेत. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील दुष्काळी भागात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. फलटण तालुक्यातील पश्चिम भागाला ज्या धरणातून पाणी मिळत होते. धोम-बलकवडी धरणात पाणीसाठा शिल्लक नाही, तर औंध भागाला पाणीपुरवठा करणारा येळीव तलाव अक्षरश: भेगाळला आहे. माण तालुक्यात १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मार्च महिन्यातच ही अवस्था तर एप्रिल, मे महिन्यात काय अवस्था होईल, याचा विचार केलेलाच बरा. संभाव्य भीषण टंचाईचा विचार करता प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करावी, अशी मागणी दुष्काळी भागातील नागरिकांमधून होत आहे.त्याचप्रमाणे जनावरांसाठी चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
मृतसाठाही संपला --येळीव तलावात मृतसाठा म्हणून काही पाणी राखून ठेवण्यात आले होते. या साठ्यातून गेल्या आठवड्यात चारशे मीटर केबल व पाईप टाकून औंधला पाणी देण्यात आले. परंतु त्याचाही काही उपयोग नसून तेही पाणी संपले आहे.
औंधमध्ये पाण्याची भीषण टंचाई असून प्रशासनाने लवकरात लवकर येळीव तलावात पाणी सोडावे. आम्ही तशी मागणी आम्ही खटाव तहसीलदारांकडे केली आहे.
- रोहिणी थोरात, सरपंच, औंध