विदर्भातील वाघ सह्याद्रीत आणण्याचा प्रस्ताव : खामकर
By Admin | Updated: April 23, 2016 00:42 IST2016-04-22T21:52:09+5:302016-04-23T00:42:59+5:30
‘वाघ असणाऱ्या १३ देशांची नवी दिल्लीत व्याघ्र संवर्धन परिषद नुकतीच झाली.

विदर्भातील वाघ सह्याद्रीत आणण्याचा प्रस्ताव : खामकर
कऱ्हाड : विदर्भातील जादा वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या कोयना, चांदोली व राधानगरी परिसरात सोडता येऊ शकतात का, यासाठीचा प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत. पुढील महिन्यात याबाबत नागपूर येथे वन विभागाच्या मुख्यालयात प्राथमिक बैठक होण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती वन्यजीव अभ्यासक नाना खामकर यांनी दिली.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने नवी दिल्लीतील जागतिक व्याघ्र संवर्धन परिषदेत झालेल्या चर्चेची माहिती खामकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. विभागीय वन (वन्यजीव) अधिकारी मिलिंद पंडितराव, एस. एल. झुरे, सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, व्ही. एस. थोरात, वनक्षेत्रपाल किरण कांबळे, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचे तज्ज्ञ शैलेश माहुलीकर वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खामकर म्हणाले, ‘विदर्भातील ताडोबा, पेंच व मेळघाट या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मनुष्य व वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढीस लागला आहे. यावर उपाय म्हणून वन्यजीवतज्ञांनी ज्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी अतिरिक्त वाघ सोडण्याची सूचना शासनाला दिली आहे.
‘वाघ असणाऱ्या १३ देशांची नवी दिल्लीत व्याघ्र संवर्धन परिषद नुकतीच झाली. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत झाले. या परिषदेत मी व रोहन भाटे सहभागी झालो होतो.
या परिषदेत २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पटीने वाढविण्याचा संकल्प करण्यात आला. त्या अनुषंगाने ज्या देशांमध्ये वाघ नामशेष होत चालले आहेत अथवा त्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होत आहे, अशा देशांमध्ये वाघांचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरले. त्यासाठी भारत इतर देशांना सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले. व्हिएतनाम, कम्बोडिया व म्यानमार या देशांमध्ये वाघ झपाट्याने कमी होत आहेत. या देशांना भारताने सहकार्य करण्याचे ठरवले आहे.’ (प्रतिनिधी)