इलेक्ट्रिक वाहन वापरास २ टक्के व सौरऊर्जा वापरास १० टक्के
पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : सध्या जागतिक पातळीवर तापमान वाढीमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम पाहता राज्य शासनाने पर्यावरण संवर्धनविषयक धोरण हाती घेतले आहे. त्यानुसार मलकापूर पालिकेनेही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मलकापुरात इलेक्ट्रिक वाहन वापरास २ टक्के व सौरऊर्जा वापरास १० टक्के अशी मालमत्ता करात १२ टक्के सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली आहे.
मलकापूर पालिकेने यापूर्वी लोकसहभागाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजना हाती घेऊन नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याकरिता वेळोवेळी मालमत्ता करात सूट व अनुदान दिलेले आहे. सौरऊर्जेचा वापर व्हावा याकरिता पालिकेच्या फंडातून नागरिकांना एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली आहे. तसेच सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या मिळकतधारकांना संकलित करामध्ये १० टक्के सूट दिलेली आहे. त्याप्रमाणे यापुढेही मलकापूर शहरामध्ये जे मिळकतधारक इमारतीसाठी सौरऊर्जा (सोलर वॉटर हिटर व सौर दिवे) वापरतील, त्यांना संकलित करामध्ये १० टक्के सूट देण्यात येणार आहे. याप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ हाती घेतले आहे. इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या स्थानिक नागरी संस्थांतील नागरिकांना व गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्ता करात सूट देण्याबाबत महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने नुकताच निर्णय घेतलेला आहे. याअनुषंगाने इलेक्ट्रिक वाहनाकरिता स्वत:चे चार्जिंग स्टेशन उभारल्यास मालमत्ता करात २ टक्के सूट, तर गृहनिर्माण संस्थांमध्ये सामुदायिक चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध केल्यास मालमत्ता करात ५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या मालकीच्या जागेत व्यापारी तत्त्वावर चार्जिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या जागेकरिता व्यापारी दराने मालमत्ता कराची आकारणी न करता ती घरगुती दराने करण्याचा निर्णय घेतला आहे. तो येथील पालिकेने शहरात राबविण्याचे ठरविले आहे.
चौकट :
सौरऊर्जा व इलेक्ट्रिक वाहने वापरल्यास १२ टक्के सूट
डिझेल व पेट्रोलच्या वाहनामुळे वाढत्या वायुप्रदूषणावर उपाययोजना म्हणून शहरात सौरऊर्जा व इलेक्ट्रिक वाहने वापराकरिता नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे. सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या मिळकतधारकांना संकलित करामध्ये १० टक्के, तर इलेक्ट्रिक वाहनाकरिता वैयक्तिक चार्जिंग स्टेशन उभारल्यास मालमत्ता करात २ टक्के व गृहनिर्माण संस्थांमध्ये सामुदायिक चार्जिंग स्टेशन उभारल्यास ५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोट :
या योजनांचा मलकापूर पालिका कार्यक्षेत्रामधील नागरिकांना व गृहनिर्माण संस्थांना फायदा होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक धोरण २०२१ मध्ये सहभागी होऊन मालमत्ता कराच्या सुटीचा लाभ घ्यावा.
- नीलम येडगे, नगराध्यक्षा
कोट :
चार्जिंग स्टेशन व सौरऊर्जा वापर करणाऱ्या मिळकतधारकांना मालमत्ता करात सूट देणार आहोत. या संदर्भात अधिक माहितीसाठी विद्युत अभियंता धन्वंतरी साळुंखे व कर निरीक्षक राजेश काळे यांच्याशी संपर्क साधावा.
- राहुल मर्ढेकर
मुख्याधिकारी