जावळीत मानकुमरे करणार उदयनराजेंचा प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:44 IST2019-04-05T22:44:21+5:302019-04-05T22:44:27+5:30
सातारा : राजकारणात कोणीही कायमस्वरुपी शत्रू नसतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध होत असून, राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि जिल्हा ...

जावळीत मानकुमरे करणार उदयनराजेंचा प्रचार
सातारा : राजकारणात कोणीही कायमस्वरुपी शत्रू नसतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध होत असून, राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी खांद्याला खांदा लावून जावळीत प्रचारास सुरुवात केली. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ या वळणावर, असे म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या साक्षीने दोघांनी मैत्रीचे संबंध पुनर्स्थापित केले.
सातारा लोकसभा मतदार संघातून खासदार उदयनराजे भोसले हे तिसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्याशी त्यांची वादावादी झाली होती. तसेच उदयनराजे व त्यांच्यात राजकीय भूमिकेवरून मतभेद निर्माण झाले. हे मतभेद गेल्या दीड वर्षात अगदी टोकापर्यंत गेले होते. एवढेच नव्हे तर पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद गेला होता.
त्यावेळी एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडत होत्या. या दोन नेत्यांचा संघर्ष टोकाचा झाला होता. त्यामुळे पोलिसांना हे दोन नेते कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येताना प्रचंड खबरदारी घ्यावी लागत होती.
मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाले गेले विसरून हे दोन्ही नेते जावळी तालुक्यातील प्रचार दौऱ्यात सक्रिय झाल्याने नागरिकही आवक झाले आहेत.
मेढा, करहर, कुडाळ, हुमगाव, म्हसवे, बामणोली आदी ठिकाणी झालेल्या प्रचार सभा, बैठका व प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेताना ते दिसून आले. तसेच ऐकमेकांशी दिलखुलासपणे चर्चा करीत असताना दिसले. त्यामुळे राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हेच सिद्ध होते, अशी चर्चा सातारा, जावळी तालुक्यांमध्ये सुरू आहे.