सत्ता बदलाच्या मर्यादा झुगारून विकास करू
By Admin | Updated: November 5, 2015 00:12 IST2015-11-04T21:51:39+5:302015-11-05T00:12:13+5:30
दीपक चव्हाण : विविध विकासकामांचे फलटण तालुक्यात उद्घाटन

सत्ता बदलाच्या मर्यादा झुगारून विकास करू
फलटण : फलटण तालुक्यात गेल्या १५ - २० वर्षांत कृषी व औद्योगिक विकास गतीमान होत असताना पाणी, वीज, आरोग्य, रस्ते, शिक्षण या नागरी सुविधा ग्रामस्थांना प्राधान्याने उपलब्ध करून दिल्या गेल्या; मात्र राज्यातील सत्ता बदलानंतर त्यावर काही प्रमाणात मर्यादा येणार असल्या तरी रामराजे यांच्या माध्यमातून विकासाची गती कायम ठेवण्याचा सर्वांचाच प्रयत्न असल्याचे आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यातील काही रस्त्यांच्या कामासाठी नाबार्डमधून २ कोटी २५ लाख आणि शासन निधीतून ३० लाखांचा भरीव निधी उपलब्ध झाला असून, चार रस्त्यांचे भूमीपूजन व कामाचा शुभारंभ आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, पंचायत समिती सभापती स्मिता सांगळे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता एम. डी. पाटील, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तालुक्याचा एक तृतीयांश भाग बागायती असला तरी दोन तृतीयांश भागातील शेती पावसावर अवलंबून असल्याने तेथील अनेक कुटुंबे मुंबईतील कापड बाजार व लोखंडी जथ्यातील मजुरीवर अवलंबून असत. त्यांना दिलासा देण्यासाठी १९९५ मध्ये अपक्ष म्हणून विधानसभेत पोहोचल्यापासून रामराजे यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार व सहकारी अपक्ष आमदारांच्या मदतीने राज्यातील युती शासनाला कायम दुष्काळी पट्ट्यातील शेतीसाठी प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांची पूर्तता करण्याची अट घालून पाठींबा दिला. त्यामुळे या मतदारसंघाप्रमाणेच राज्याच्या अन्य भागातील ३५ कायम दुष्काळी तालुक्यातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्याचे आ. दीपक चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
तालुक्यातील एक तृतीयांश बागायती पट्ट्याकडेही रामराजे व आम्हा सर्वांचे नेहमीच लक्ष आहे. म्हणूनच कर्जाच्या खाईत बुडालेला श्रीराम साखर कारखाना सात-आठ वर्षात कर्जाच्या खाईतून वर काढण्यात यश आले. श्रीरामने सर्वप्रथम उसाची एफआरपीप्रमाणे होणारी पूर्ण रक्कम ऊस उत्पादकांना एक महिन्यापूर्वी अदा केली असून, यावर्षीचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतने चालवून ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी श्रीराम सज्ज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
श्रीरामप्रमाणेच बाजार समितीत शेती उत्पादनाला रास्त दर, योग्य वजन आणि शेतकऱ्यांचा सन्मान या गोष्टीला प्राधान्य देत बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे प्रयत्नशील आहेत. कांद्याचे दर पडल्यानंतर व्यापाऱ्यांशी चर्चा करून फलटण बाजार समितीत विक्रीस आलेल्या कांद्याला योग्य दर मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रूत आहेत. संजीवराजे यांनी तालुक्यातील बागायती आणि जिरायती भागात सतत संपर्क ठेवून तेथील जनता, शेतकरी, तरूण, महिला, विद्यार्थी सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यास नेहमी प्राधान्य दिले आहे.
राज्यात सत्ताबदल झाला असला, तरी जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, साखर कारखाने व अन्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असल्यानेआणि जिल्ह्यातील दोन्ही खासदार व अनेक आमदार राष्ट्रवादीचे असल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवूणक आणि त्यांना दिलासा देणयात आम्ही कमी पडणार नाही, अशी ग्वाही आ. चव्हाण यांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, स्मीता सांगळे, पुष्पा सस्ते, पदाधिकारी व ग्रामस्थांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. (प्रतिनिधी)
कोट्यवधींची कामे मंजूर
जिंती-फलटण- गिरवी- वारूगड प्रजिमा १० पैकी जिंती ते पाटण वस्ती या दोन किमी रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरणासाठी १ कोटी १६ लाख ९१ हजार रुपये, पाडेगाव - रावडी-सांगवी- सोनगाव प्रजिमा ६ पैकी सोनगाव-सरडे या दीड किमी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी ५५ लाख १० हजार, फलटण -आसू ७ पैकी ढवळेवाडी पाटी ते बेडके वस्ती दीड किमीचे रूंदीकरण व डांबरीकरणासाठी ५० लाख ९९ हजार रुपये नाबार्डमधून आणि फलटण - शिंगणापूर प्रजिमा १३ पैकी मिरढे-जावली या ७०० मीटर रस्त्यासाठी ३० लाख रुपये शासन निधीतून मंजूर झाले आहेत.