वडूजमध्ये अल्पवयीन दुचाकीस्वारांचा सुळसुळाट....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST2021-03-09T04:41:56+5:302021-03-09T04:41:56+5:30

वडूज : शाळा, काॅलेज आणि इतर शैक्षणिक शिक्षणासाठी वेळेत पोहोचण्यासाठी अल्पवयीन मुला-मुलींकडून वडूज शहरात सर्रास दुचाकींचा वापर होत आहे. ...

The proliferation of minor two-wheelers in Vadodara .... | वडूजमध्ये अल्पवयीन दुचाकीस्वारांचा सुळसुळाट....

वडूजमध्ये अल्पवयीन दुचाकीस्वारांचा सुळसुळाट....

वडूज : शाळा, काॅलेज आणि इतर शैक्षणिक शिक्षणासाठी वेळेत पोहोचण्यासाठी अल्पवयीन मुला-मुलींकडून वडूज शहरात सर्रास दुचाकींचा वापर होत आहे. तसेच या दुचाकीस्वारांच्या वाहनांचा वेगही जादा असल्याने अनेकवेळा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अशा घटना थोपविण्यासाठी पालकांबरोबरीने पोलीस प्रशासनाकडून शहरात धडक मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शाळेपासून आपण जवळच राहतो, काय हरकत आहे, मुलाने गाडी नेली तर? पाच मिनिटांचे काम आहे, ये पटकन बाजारात जाऊन, घरी सोडायला कोण नाही, जा गाडी घेऊन‌... हे अतिलाडाचे प्रकार कोठे तरी थांबविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. मुलांच्या हट्टापायी आपण त्यांना नवीन गाडी घेऊन देतो. अल्पवयीन मुलांकडे समयसूचकतेचे प्रमाण फारच कमी असल्याने वाहन चालवताना छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. तर? प्रसंगावधान मूलमंत्राचे ज्ञान अपुरे असल्याने अनेक अपघाती प्रसगांना पालकांसह अल्पवयीन चालकाला प्रसंगी मोठी किंमत मोजावी लागली आहे. हीच दुचाकी कधी-कधी त्यांच्याकरिता घातक ठरू शकते. केवळ पालकांनीच नव्हे, तर? समाजातील प्रत्येक घटकाने याकरिता पुढाकार घेणे आवश्यक आहे. शाळांनीही दुचाकी घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मज्जाव करून, अल्पवयात गाडी चालविणे किती घातक ठरू शकते, याचे गांभीर्य पटवून देणे काळाची गरज बनली आहे.

पोलीस प्रशासनानेही यांच्यावर दंडात्मक कारवाई करून अल्पवयीन वाहन चालकांवर अंकुश ठेवणे अत्यावश्यक आहे. वाहनचालक परवाना नसताना व अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालवणे गुन्हा असताना देखील पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत, हाच मुळात कळीचा मुद्दा बनला आहे. पोलिसांच्या गांधारीच्या भूमिकेमुळे वडूज शहरात हेच अल्पवयीन दुचाकीस्वार बिनधास्तपणे आणि राजरोसपणे वाहने मिरवत आहेत.

पालक, विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये, पोलीस प्रशासन व समाजातील प्रत्येक घटकाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. रस्त्यावरील वाढत असलेले अपघात व अपघातात होणारे शरीराचे कधीही भरून न येणारे नुकसान आणि प्रसंगी अल्पवयीन मुला-मुलींचे जाणारे प्राण, ही खूपच वेदना देणारी बाब आहे. यासाठी सर्वच स्तरातून प्रबोधन होणे आवश्यक आहे. तसेच अल्पवयीन मुला-मुलींनीही वाहने चालविण्याच्या बालहट्टाला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील राहिले, तरच संभाव्य गंभीर अपघात टाळले जाऊ शकतील.

चौकट

अल्पवयीन व्यक्तीनं गुन्हा केल्यास वाहनाच्या मालकाला दोषी ठरवलं जाईल आणि २५ हजार रुपये दंडासोबत ३ वर्षांचा तुरुंगवास होईल. शिवाय, गाडीची नोंदणी एक वर्षासाठी रद्द केली जाईल. तसेच अल्पवयीन आरोपी २५ वर्षांचा होईपर्यंत त्याला वाहन परवाना दिला जाणार नाही.

फोटो- संग्रहीत फोटो दुचाकीस्वार फीचर वापरणे

Web Title: The proliferation of minor two-wheelers in Vadodara ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.