सातारा जिल्ह्यात निषेध, बंद अन् मोर्चा
By Admin | Updated: June 9, 2014 01:17 IST2014-06-09T01:14:38+5:302014-06-09T01:17:13+5:30
महापुरुषांचे आक्षेपार्ह छायाचित्र : आज ‘सातारा बंद’

सातारा जिल्ह्यात निषेध, बंद अन् मोर्चा
सातारा : ‘सोशल मीडिया’वर महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचे पडसाद आज, रविवारी सातारा जिल्ह्यात उमटले. महाबळेश्वर येथे मोर्चा काढून अवमान करणाऱ्या युवकाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. सातारा शहरातून विविध सामाजिक संघटनांनी निषेध रॅली काढली आणि उद्या, सोमवारी ‘सातारा बंद’ची हाक दिली. दरम्यान, आंबेडकरप्रेमींनी संयम दाखविल्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
महापुरुषांची आक्षेपार्ह आणि अवमानकारक प्रतिमा ‘सोशल मीडिया’वर पोस्ट केल्याची घटना जिल्ह्यात समजताच त्याची पहिली प्रतिक्रिया फलटण शहरात उमटली आणि तिचे पडसाद जिल्हाभरात उमटले. माण, जावळी आणि पाटण येथे काहीवेळ बाजारपेठ बंद होती. सातारा, कऱ्हाड आणि कोरेगाव शहरांत निषेध फेरी काढली.
सातारा येथे सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी आंंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि शहरात निषेध फेरी काढली. ‘रिपाइं’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गायकवाड, पार्थ पोळके, चंद्रकांत खंडाईत, दयानंद माने, प्रवीण धस्के, संदीप कांबळे, नीलेश भिसे, नवनाथ शिंदे सहभागी झाले होते. दरम्यान, निषेध मोर्चातच ‘सातारा बंद’ची हाक देण्यात आली.
कऱ्हाड शहरात कडकडीत बंद पाळला. व्यापारी पेठ तसेच सर्वच दुकाने दिवसभर बंद राहिली. रविवार आठवडी बाजाराचा दिवस असतानाही शुकशुकाट जाणवत होता.
कोरेगावात मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला. वाठार स्टेशन येथे रेल्वे रोखली. शिरवळ येथे उद्या, सोमवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार असून, तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. दहिवडीत बंद पाळण्यात आला. जावळी येथे उद्या निषेध सभा आयोजित केला असून, यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ‘रिपाइं’चे तालुकाध्यक्ष संजय गाडे यांनी दिली. (प्रतिनिधी)