दबाव झुगारून प्लास्टिक बंदी !
By Admin | Updated: November 15, 2015 01:04 IST2015-11-15T00:55:24+5:302015-11-15T01:04:22+5:30
महाबळेश्वर पालिकेची जोरदार मोहीम : व्यापाऱ्यांच्या हाती दिसू लागल्या कापडी पिशव्या

दबाव झुगारून प्लास्टिक बंदी !
महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिक विरोधी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी केल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर काही लोकांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु या सर्व दबावावर मात करून ही मोहीम सुरू ठेवली आहे. मुख्याधिकारी सचिन पवार यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे महाबळेश्वरने प्लास्टिक मुक्तीकडे वाटचार सुरू केली आहे. ही मोहीम पालिकेने अशीच चालू ठेवली तर लवकरच महाबळेश्वर हे प्लास्टिकमुक्त होईल, असा विश्वास पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.
प्लास्टिक बंदीच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेने चार पथके तयार केली असून, या पथकांनी रोज शहरात धाडी टाकून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग जप्त करण्याचा धडाका लावला आहे. शहरातील व्यापारी कॅरिबॅग ठेवणे बंद केले आहे. अनेक व्यापारी स्वत:हून या मोहिमेत सहभाग होत आहे. प्लास्टिक पिशव्यांऐवजी आता अनेक व्यापाऱ्यांकडे कापडी व कागदी पिशव्या दिसू लागल्या आहेत.
प्लास्टिक कॅरिबॅगचे निसर्गावर होणारे दुरगामी परिणाम लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली; परंतु महाबळेश्वर हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवदेनशील असूनही येथे प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. पालिका प्लास्टिक बंदीबाबत विविध प्रकारचे ठराव करीत होती. विविध उपक्रम सुरू करीत करून प्लास्टिक बंदीबाबत आम्ही किती जागरुक आहोत, याचा देखावा केला जात होता. गेली अनेक वर्षे हेच घडत होते. त्यामुळे महाबळेश्वरच्या चोहो बाजूंनी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जमा होत होता.
गेल्या महिन्यात वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे हे महाबळेश्वर भेटीवर आले असता त्यांनी महाबळेश्वरमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वारेमाप वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांना धारेवर धरले. विविध खात्यांच्या प्रमुख अधिकारी यांची हिरडा विश्रामगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रधान सचिव यांनी १ नोव्हेंबर पासून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशच पालिकेला दिले होते. प्रधान सचिव यांनी आदेश देताच पालिका कामाला लागली. यानंतर पालिकेने शहरतील सर्व प्रकारचे व्यापारी यांची माहिती गोळा केली. वर्तमानपत्रातून प्रसिद्धी बैठका घेतल्या तसेच सर्वांना ‘एसएमएस’द्वारे प्लास्टिकबंदीबाबत माहिती दिली. अंमलबाजवणीसाठी चार पथके तयार केली. प्रत्यक्ष अंमलबजावणी पाच नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली व चार दिवस जप्तीचा धडाका लावण्यात आला. जप्त केलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा खच जमा होऊ लागला असून, अनेक व्यापाऱ्यांनी कापडी पिशव्यांचा वापर सुरु केला आहे. (प्रतिनिधी)
महाबळेश्वर पालिकेने प्लास्टिक विरोधी मोहिम हाती घेतली असून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यास प्रारंभ केला आहे. एक आठवडा हा फक्त जप्तीसाठी ठेवण्यात आला आहे. जे व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना आढळतील अशा व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल
- सचिन पवार, मुख्याधिकारी