यात्रा बंद असल्याने व्यावसायिक बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:31+5:302021-01-08T06:04:31+5:30

गतवर्षी १५ मार्चपासून गावोगावच्या यात्रांवर बंदी घालण्यात आली. कोरोनाने कऱ्हाड तालुक्यासह पाटण तालुक्यात प्रवेश केल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले होते. ...

Professional unemployed due to travel closure | यात्रा बंद असल्याने व्यावसायिक बेरोजगार

यात्रा बंद असल्याने व्यावसायिक बेरोजगार

गतवर्षी १५ मार्चपासून गावोगावच्या यात्रांवर बंदी घालण्यात आली. कोरोनाने कऱ्हाड तालुक्यासह पाटण तालुक्यात प्रवेश केल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले होते. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी विविध सण, उत्सवांसह गर्दीच्या कार्यक्रमांवर प्रशासनाने निर्बंध लादले. यात्राही बंद करण्यात आल्या. त्यामुळे कित्येकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. याचा फटका छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसला आहे. यात्रेमध्ये चिरमुरे, मिठाईची दुकाने, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, ग्रामदैवतांच्या पूजेचे साहित्य, गुलाल खोबऱ्याचे स्टॉल, कटलरी साहित्य, आईस्क्रीमची हातगाडी, हॉटेल, फरसाण दुकाने आणि आकाश पाळणे, आदी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

व्यावसायिक गावोगावी जाऊन यात्रांमध्ये व्यवसाय करत असतात. यात्रा बंद असल्याने गत आठ महिने हे सर्वजण घरीच बसून आहेत. तसेच कुस्त्यांची मैदाने पूर्णपणे बंद झाली आहेत. त्यामुळे कुस्तीशौकिनांची निराशा होत असून, यात्रांमध्ये होणारे लोकनाट्य तमाशादेखील बंद पडले आहेत. त्यामुळे तमाशा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा ही लोककला जोपासण्यासाठी गावोगावी होणाऱ्या यात्रा पुन्हा सुरू व्हायला हव्यात. यात्रांवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना शासनाने मदतीचा हात द्यायला हवा. अन्यथा लवकरात लवकर यात्रा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

- चौकट

शासकीय नियमांचे पालन आवश्यक

यात्रेमध्ये येणाऱ्या सर्वांना मास्क बंधनकारक करून प्रत्येकाने काळजी घेतल्यास यात्रा भरवायला काही हरकत नसावी तसेच यात्रा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्ववत होण्यासाठी मदत होणार असल्याने राज्य शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, असे मत गावोगावच्या ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे.

Web Title: Professional unemployed due to travel closure