टाकाऊपासून केली ‘लाईफ जॅकेट’ची निर्मिती! विद्यार्थिनीची कल्पकता

By Admin | Updated: August 27, 2014 23:29 IST2014-08-27T22:04:29+5:302014-08-27T23:29:18+5:30

उडतारेच्या बाळासाहेब पवार हायस्कूलच्या प्रयोगाची राज्यस्तरावर निवड

Produce the life jacket from Kadau Student's imagination | टाकाऊपासून केली ‘लाईफ जॅकेट’ची निर्मिती! विद्यार्थिनीची कल्पकता

टाकाऊपासून केली ‘लाईफ जॅकेट’ची निर्मिती! विद्यार्थिनीची कल्पकता

सातारा : विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन दिल्यानंतर नवनिर्मिती होते. उडतारे, ता. वाई येथील बाळासाहेब पवार हायस्कूलमधील इयत्ता ८ वीत शिकणाऱ्या श्रध्दा मदन शेडगे या विद्यार्थिनीने टाकाऊ वस्तूंचा वापर करुन पुरात उपयोगी ठरणारे ‘लाईफ जॅकेट’ बनवून ग्रामीण भागातील संशोधक वृत्तीचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. तिच्या या प्रयोगाची राज्यस्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मार्गदर्शक शिक्षक सुनील बाबर यांनी या मुलीतील नवनिर्मितीच्या उमेदीला बळ दिले आहे. मुलांमधील संशोधक वृत्ती वाढीस लागावी, या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा आणि शिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य विज्ञान परिषद, नागपूर यांच्या माध्यमातून ‘एन्स्पायर अ‍ॅवॉर्ड’ ही स्पर्धा घेतली जाते. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय असे या स्पर्धेचे तीन टप्पे आहेत. वाई तालुक्यातील उडतारे हायस्कूल प्रयोगशील शाळा म्हणून प्रसिध्द आहे. या स्पर्धेत हायस्कूल नेहमी भाग घेते. स्पर्धेसाठी सर्वांना उपयोगी पडेल, असे मॉडेल बनविण्याचे नियोजन झाले. या गावातून कुडाळी नदी वाहते. परिसरात छोटे-मोठे ओढेही मोठ्या प्रमाणावर आहेत. पावसाळ्यात नेहमी नदी व ओढ्यांना पूर येतो. येथील शेतकरी नदीचे पात्र ओलांडून शेतीच्या कामासाठी जातात. भांगलण व इतर कामांच्या निमित्ताने महिलाही पुराच्या पाण्यातून नदी ओलांडून शेतात जातात. जिवावर उदार होऊनच ही कामे सुरू असतात. या पार्श्वभूमीवर टाकाऊ बाटल्या व कापडापासून ‘लाईफ जॅकेट’ बनविण्याचा निर्धार श्रध्दा शेडगे या विद्यार्थिनीने केला. शाळेतील प्रयोगशील शिक्षक सुनील बाबर यांनी तिच्या या निर्धाराला बळ दिले. प्लास्टिकच्या बाटल्या व कापडापासून तिने हे लाईफ जॅकेट तयार केले. कुडाळी नदीला आलेल्या पुरात या लाईफ जॅकेटची यशस्वी चाचणी घेण्यात आली. नागठाणेतील रामकृष्ण विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड प्रदर्शनात हा प्रयोग अव्वल ठरला असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरविंद चव्हाण, मुख्याध्यापक अभिमन्यू पवार, विज्ञान शिक्षक सुनील बाबर, विज्ञान मंडळाचे सदस्य अनिकेत निंबाळकर, राहुल कुरुळे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Produce the life jacket from Kadau Student's imagination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.