उत्तेश्वर देवालयाची यात्रा साधेपणाने साजरी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST2021-01-20T04:38:43+5:302021-01-20T04:38:43+5:30
बामणोली : शिवसागर जलाशयाच्या पलीकडील वाळणे, ता. महाबळेश्वर गावच्या उंच पर्वतरांगेत असणारे स्वयंभू शंकराचे स्थान असलेल्या उत्तेश्वर ...

उत्तेश्वर देवालयाची यात्रा साधेपणाने साजरी होणार
बामणोली : शिवसागर जलाशयाच्या पलीकडील वाळणे, ता. महाबळेश्वर गावच्या उंच पर्वतरांगेत असणारे स्वयंभू शंकराचे स्थान असलेल्या उत्तेश्वर येथील यात्रा संपूर्ण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या यात्रेला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक उपस्थित राहत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा साध्यापद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेल्या आवाहनानुसार, उत्तेश्वर देवस्थान ट्रस्ट वाळणे यांनी वानवली, गावडोशी, निवळी, रवदी, दरे तर्फे तांब या गावांतील उत्तेकर व गोगावले यांना विश्वासात घेऊन यात्रा साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीच्या यात्रा उत्सवास २६ जानेवारी २०२१ पासून सुरुवात होईल. या दिवशी देवाचा घाणा वानवली उत्तेकर येथे होईल. तसेच २७ जानेवारी रोजी यात्रा उत्सवाला आरंभ होईल. या दिवशी कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. रात्री देवाचे दर्शन होईल व छबिना साधेपणाने साजरा होईल. २८ जानेवारी रोजी सकाळी पुष्य नक्षत्रावर देवांचा लग्न सोहळा अत्यंत मोजक्या लोकांमधे साजरा होईल. दुपारी यात्रा समाप्त होईल.
यात्रा कालावधीत भाविकांनी सुरक्षित सामाजिक व शारीरिक अंतर राखून सहकार्य करावे, गर्दी टाळावी. मास्क वापरावे व हात साबणाने धुवावेत, तसेच् येथे मिठाई व प्रसाद साहित्य विक्री बंदी असल्याने संबंधित दुकानदारांनी आपली दुकाने आणू नयेत, असे आवाहनही देवस्थानचे ट्रस्टी यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
भाविकांनी या देवस्थानचे पावित्र्य लक्षात घेऊन कोरोना संकट दूर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानच्या विश्वस्थांनी केले आहे.