लोकांच्या पुढाकारातून सोडवला शिवार रस्त्याचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:51+5:302021-02-05T09:18:51+5:30
पिंपोडे बुद्रुक : दोन्ही बाजूंनी झाडाझुडपांनी वेढलेला अरुंद रस्ता, पावसाळ्यात गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यातून डोक्यावर ओझं घेत ओढ्या-नाल्यातून वर्षानुवर्षे ये-जा ...

लोकांच्या पुढाकारातून सोडवला शिवार रस्त्याचा प्रश्न
पिंपोडे बुद्रुक : दोन्ही बाजूंनी झाडाझुडपांनी वेढलेला अरुंद रस्ता, पावसाळ्यात गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यातून डोक्यावर ओझं घेत ओढ्या-नाल्यातून वर्षानुवर्षे ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिवार रस्त्याचा प्रश्न जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांच्या सहकार्यातून व गावकरांच्या पुढाकारातून सुटला आहे. या रस्त्यासाठी परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपल्या पिकांतून वाट मोकळी करून दिली आहे.
तालुक्यातील उत्तरेकडील परिसरातील बहुतांश लोकांचे जीवन शेतीशी निगडित आहे, ही बाब केंद्रस्थानी ठेवून जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी परिसरातील शेती, पाणी, रस्ते, शिक्षण यांसारख्या पायाभूत सुविधांना प्राधान्यक्रम दिला आहे. परिसरात बहुतांश ठिकाणी विविध विकासकामे सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नातून विविध शिवार रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे. सोनके (ता. कोरेगाव) येथील बेंद शिवारात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी बरीच वर्षे प्रलंबित असलेला शिवार रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. विशेष म्हणजे, यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात उभ्या असलेल्या आले, हरभरा, ज्वारी, ऊस पिकांतून वाट मोकळी करून दिली आहे. दरम्यान, भविष्यकालीन परिस्थितीचा विचार करता शेतीसाठी पाणी व रस्ते या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून, परिसरातील जनतेने विकासकामांचा पाठपुरावा करावा, असे आवाहन कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केले आहे.
(कोट)
लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या पुढाकारातून रस्त्याचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांसह शेतातील शेतीमालाची वाहतूक सुलभ झाली आहे. शेतकऱ्यांनी चालू पिकांतून वाट करून दिल्याने इतर शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
सतीश धुमाळ
माजी चेअरमन
विकास सेवा सोसायटी, सोनके
-----------------
२५सोनके
फोटो- सोनके (ता. कोरेगाव) येथे आले पिकातून रस्ता करतेवेळी कृषी सभापती मंगेश धुमाळ व शेतकरी उपस्थित होते.