द्राक्षांवर भुरी, डाळिंबावर तेल्या रोगांचे संकट
By Admin | Updated: January 9, 2015 00:01 IST2015-01-08T22:12:40+5:302015-01-09T00:01:52+5:30
अवकाळीचे सावट : कातरखटावमधील बागायतदार अडचणीत

द्राक्षांवर भुरी, डाळिंबावर तेल्या रोगांचे संकट
कातरखटाव : गेल्या महिन्यात गारपीट व अवकाळीतून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा नवीन वर्षाच्या आगमनालाच अवकाळी पावसाने व हवामान बदलामुळे द्राक्ष बागायतदारांपुढे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ढगाळ हवामानामुळे द्राक्षांवर भुरी व दावण्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गेली चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे सूर्यदर्शन तर होतच नाही. रात्री-अपरात्री पहाटे कधीही धुके पडत आहेत. अचानक पडणाऱ्या धुक्यामुळे पोटऱ्यात आलेल्या ज्वारीवर मावा, चिकटा पडला असून, ज्वारी पोटऱ्यातच राहणार, कणीस बाहेर पडणार नाही, या भीतीने शेतकरी चिंतेत आहे.
खराब हवामानामुळे द्राक्षांवरही भुरी रोगाचे संकट निर्माण झाले आहे. द्राक्षांच्या घडामध्ये आळी होऊन घड खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कीड लागलेला घड काढून फेकून द्यावा लागत आहे. दिवसातून दोनवेळा औषध मारून शेतकरी बेजार होत आहे.
याबरोबरच द्राक्षांच्या घडावर पाणी साचून राहत असल्यामुळे मध्यम स्थितीत आलेल्या द्राक्षांचे मणी काळे पडून गळून गेल्यामुळे नुकसान होत आहे.
एकंदरीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अवकाळी पाऊस पडत असून, आणखी काही दिवस ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. गारपीट व अवकाळीच्या कचाट्यातून शेतकरी सावरत असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर व फळ बागायतदारवर संकट ओढवल्यामुळे बळीराजा पुरता मेटाकुटीस आला आहे. (वार्ताहर)
डाळिंबालाही फटका
दुसरीकडे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा जास्त फटका बसला असून, डाळिंब बागेवर तेल्या, कुडबा, मररोग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हजारो रुपये औषधासाठी खर्च करूनही अवकाळीने आपली कळा दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याच्या झळा पोचत आहेत व अवकाळी पावसाने चांगलीच झोप उडवली आहे.
अजून पाच ते सहा दिवस असेच ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे. ज्वारी, हरभरा, द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणार आहे. बागायतदारांनी व शेतकऱ्यांनी औषध फवारणी करून पिके वाचवावीत.
-यू. एम. मिकुटे, कृषी अधिकारी