लोणंद : उज्जैन येथे देवदर्शनास चाललेल्या खासगी प्रवासी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीनजण ठार झाले. हा अपघात रविवारी पहाटे अडीचच्या दरम्यान फलटण तालुक्यातील सालपे येथील बिरोबा मंदिरासमोर झाला. सलमान इम्तियाज सय्यद (वय २४, रा. मालबाग पाटील गल्ली ,शिरढोण ता. शिरोळ जि. कोल्हापूर), रजनी संजय दुर्गुळे (४८, रा. पेठ वडगाव ता. हातकणगले जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत.
या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
इचलकरंजी येथील खासगी प्रवासी बस (एमएच ०४ सीपी २४५२) ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशन मार्गे सालपे घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. ती बिरोबा मंदिराजवळ आली असता लोणंद बाजूकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक (एमएच ४२ बीएफ ७७८४) आला असता दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला.
या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान लोणंद पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लोणंदच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.