‘मसाज खुर्ची’त पृथ्वीराजबाबा ‘रिलॅक्स’ !
By Admin | Updated: February 7, 2015 00:10 IST2015-02-06T22:45:47+5:302015-02-07T00:10:48+5:30
वास्तुविश्व प्रदर्शन : अनेक साधनांची पृथ्वीराज चव्हाणांकडून दखल

‘मसाज खुर्ची’त पृथ्वीराजबाबा ‘रिलॅक्स’ !
कऱ्हाड : मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी आहे; पण त्या खुर्चीला किती काटे असतात, हे बसल्याशिवाय कळत नाही. याच काटेरी खुर्चीत तीन वर्षे बसलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या निवांत आहेत म्हणे. कऱ्हाडात एका प्रदर्शनादरम्यान पृथ्वीराज चव्हाण स्टॉलची पाहणी करीत असताना एक मसाज खुर्ची त्यांच्या दृष्टिक्षेपात आली. पृथ्वीराजबाबांना मोह आवारला नाही आणि ते खुर्चीत जाऊन बसले अन् त्यांनी आरामही अनुभवला खरा; पण त्याबरोबरच आपण सत्तेत नसलो तरी आपण रिलॅक्स असल्याचेच त्यांनी दाखूवन दिले. पृथ्वीराज चव्हाण खरंतर अपघातानेच राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळताना त्यांना मित्रपक्षच असणाऱ्या राष्ट्रवादीच्या घडाळाच्या काट्यानेच सारखे बेजार केले. या काट्यांना कंटाळून ही खुर्ची वर्षभरातच रिकामी होईल, अशी अटकळ विरोधकांबरोबरच स्वकीयही बांधत होते; पण आपल्या चाणाक्षपणाने तारेवरची कसरत करीत का होईना त्यांनी ती खुर्ची तीन वर्षे टिकवून ठेवली अन् मुख्यमंत्री म्हणून ते निवडणुकीलाही सामोरे गेले. सध्या राज्यात युतीचे सरकार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवांत आहेत. मतदारसंघात पूर्वीपेक्षा खूप वेळ देतायत. छोट्या मोठ्या कार्यक्रमांनाही त्यांची हजेरी लागताना दिसते. कऱ्हाड येथे आज असेच एक इंजिनिअर्स असोसिएशनचे ‘वास्तुविश्व २०१५’ प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाचा सोपस्कार उरकल्यानंतर सुमारे तासभर प्रदर्शनात वेगवेगळ्या स्टॉलला भेट देत होते. बांधकाम क्षेत्रातील माहिती व नवीन तंत्रज्ञान जाणून घेत आपल्याकडील माहितीही ते शेअर करीत होते. अर्धा-एक तासाने बाबांची स्वारी व्यायाम साहित्याच्या स्टॉलजवळ पोहोचली. अन् त्यांची नजर एका खुर्चीवर स्थिरावली. ती होती अॅटोमेटिक मसाज चेअर. त्यांनी त्या खुर्चीची आवर्जून माहिती घेतली. शेवटी खुर्ची ती खुर्चीच.
त्यांना खुर्चीवर बसण्याचा मोहही आवरता आला नाही. ते त्या खुर्चीवर निवांत बसले. अन् त्यांनी चक्क आराम अनुभवला. तीन वर्षे ज्या खुर्चीत बसून महाराष्ट्राचा गाडा हाकला, त्या खुर्चीपेक्षा आजच्या या खुर्चीत त्यांना नक्कीच चांगला आराम वाटला असेल अशी चर्चा प्रदर्शनस्थळी उपस्थित असणाऱ्यांमध्ये ऐकायला मिळत
होती. (प्रतिनिधी)
बाबा... कसं वाटतंय ?
काहीवेळ खुर्चीत बसल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी खुर्चीची सगळी माहिती घेत किंमतही विचारली. त्यानंतर ते जाण्यासाठी खुर्चीवरून उठले. मात्र, काहीनी त्यांना ‘बाबा.. कसं वाटतंय,’ असा चिमटाही काढला. त्यावेळी ‘रिलॅक्स वाटतंय,’ असं मिश्किल उत्तर पृथ्वीराज
चव्हाणांनी दिलं.