जलजीवन मिशनच्या कामाला प्राधान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:56+5:302021-02-06T05:15:56+5:30
सातारा : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाच्या घरात वैयक्तिक नळजोडणीच्या कामांचे उद्दिष्ट ...

जलजीवन मिशनच्या कामाला प्राधान्य द्यावे
सातारा : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाच्या घरात वैयक्तिक नळजोडणीच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण करावे तसेच डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर आराखड्यातील कामे वेळेत व्हावीत. या दोन्ही योजनांच्या कामास अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना राज्याचे सहकार व पणनमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांंच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार जयकुमार, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे आदी उपस्थित होते.
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट करून या मिशनअंतर्गत सन २०२४ अखेर ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला जोडणीद्वारे प्रतिदिन दरडोई किमान ५५ लीटर पाणीपुरवठा करण्यास शासन कटिबद्ध आहे. ही योजना येत्या चार वर्षांत पूर्ण करावयाची आहे. यासाठी संबंधित अधिका-यांनी या योजनांची चालू वर्षातील कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. सातारा जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ च्या आराखड्यात सद्य:स्थितीत प्रगतीपथावर असलेल्या व नवीन प्रस्तावित तसेच जुन्या पूर्ण योजनांच्या नळ पुन:जोडणीच्या १९६३ योजनांसाठी १४७.६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जलजीवन मिशन योजना राबविताना संबंधित तालुक्यातील आमदारांच्या सूचना विचारात घ्याव्यात, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. डोंगरी विभागातील विकास आराखड्यातील रस्ते, बांधकाम, पाणीपुरवठा आदी कामांच्या मान्यतेचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत. त्यास तत्काळ मान्यता दिली जाईल.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, जलजीवन मिशन ही योजना राबविताना अडचणी आल्यास त्या पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठक घेऊन त्या सोडवण्यास प्राधान्य देऊ.
यावेळी कार्यकारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. शिंदे यांनी जलजीवन मिशन योजनेचे सादरीकरण सादर केले. बैठकीस बांधकाम विभाग, महिला बालविकास, लघुपाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभागाचे संबंधित प्रमुख उपस्थित होते.
०५कलेक्टर
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकाऱी कार्यालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.