थकबाकी भरणाऱ्या गावांतील विजेच्या कामांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST2021-03-09T04:42:32+5:302021-03-09T04:42:32+5:30

सातारा : थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना व थकबाकीमुक्त गावांना विजेच्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असून, अशा गावांतील देखभाल ...

Priority to electricity works in villages paying arrears | थकबाकी भरणाऱ्या गावांतील विजेच्या कामांना प्राधान्य

थकबाकी भरणाऱ्या गावांतील विजेच्या कामांना प्राधान्य

सातारा : थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना व थकबाकीमुक्त गावांना विजेच्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असून, अशा गावांतील देखभाल दुरुस्तीची कामे तत्काळ करण्यासह नादुरुस्त रोहित्र २४ तासांत बदलून देण्याचे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादीकर यांनी सातारा येथे दिले. तर वीज बिलाच्या वसुलीत हयगय करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचेही संचालकांनी सांगितले.

वसुली मोहिमेचा आढावा घेताना भादीकर म्हणाले, साताऱ्यासह बारामती व सोलापूर मंडलांनी त्यांना दिलेले वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावावी. महसुलात घट झाल्यामुळे महावितरणची आर्थिक कोंडी झाली आहे. परिणामी वसुली मोहीम कठोरपणे राबवावी. वसुलीत हयगय करणाऱ्या अभियंता, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. संचालकांनी स्वत: राजवाडा भागातील खंडित केलेल्या वीज जोडण्यांची पडताळणी केली व काही व्यावसायिक ग्राहकांशी संवादही साधला.

‘महा कृषी ऊर्जा अभियाना’चा आढावा घेताना ते म्हणाले, ज्या गावांनी व शेतकऱ्यांनी वीज थकबाकी भरली आहे, त्यांच्या रोहित्रांची दुरुस्ती तातडीने करा. एकंबे (ता. कोरेगाव) गावातील ६८४ पैकी २७५ शेतकऱ्यांनी २९ लाखांची थकबाकी एका दिवसांत भरली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही त्यांची थकबाकी भरावी, तर गावाला मिळणाऱ्या ‘कृषी आकस्मिक निधी’तून आठ दिवसांत सर्व कामे पूर्ण करावीत. तसेच या गावांतील ३० मीटरच्या आतील सर्व शेती जोडण्या तत्काळ देण्याचेही त्यांनी सूचित केले. याप्रसंगी एकंबे येथील सरपंच शोभा कर्णे यांचा व दीपाली संतोष तारळकर या शेतकरी महिलेने १ लाख ५ हजार वीजबिल भरल्याबद्दल त्यांचाही सन्मान महिला दिनाच्या पार्श्वभूमीकर भादीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

बारामती परिमंडलात महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत ३० मीटरच्या आतील पायाभूत सुविधा न लागणाऱ्या ६९२८ प्रलंबित जोडण्यांपैकी ५४९९ जोडण्या दिल्या आहेत, तर उर्वरित जोडण्याही आठ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश भादीकर यांनी दिले. यावेळी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

सोबत फोटो :

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला सरपंच व महिला शेतकरी यांचा प्रातिनिधिक गौरव करताना महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, मुख्य अभियंता सुनील पावडे व इतर.

Web Title: Priority to electricity works in villages paying arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.