सल्याच्या सहकाऱ्याच्या घरावर छापा
By Admin | Updated: November 7, 2015 23:37 IST2015-11-07T22:46:52+5:302015-11-07T23:37:48+5:30
कागदपत्रांची तपासणी : हालचालींवर पोलिसांचा वॉच; कारवाईबाबत गोपनीयता

सल्याच्या सहकाऱ्याच्या घरावर छापा
कऱ्हाड : मोक्काप्रकरणी अटकेत असलेल्या सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्याच्या साथीदाराच्या घरावर शुक्रवारी पोलिसांनी अचानक छापा टाकला. त्याठिकाणी काही कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. मात्र, या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली असून, प्राथमिक चौकशी केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.
कऱ्हाडातील गुंड सल्याच्या टोळीवर कऱ्हाड पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. सध्या सल्या येरवडा कारागृहात असून, त्याच्या जामिनासाठी एका साथीदाराचे प्रयत्न सुरू आहेत. सल्यावर गोळीबार झाल्याने तो कायमचा जायबंदीही झाला आहे. त्याला चालता येत नाही. सल्याला जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्जही सादर करण्यात आला होता.
मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. याच पार्श्वभूमीवर सल्याच्या टोळीतील इतर सदस्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एच. एन. काकंडकी यांनी सांगितले.
पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी त्याच्या साथीदारांवर नजर ठेवण्याच्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शुक्रवारी एका साथीदाराच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला.
छाप्यात त्याच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली. सल्याचे आर्थिक व्यवहार त्याच्या माध्यमातून चालत असल्याची माहिती मिळाल्याने हा छापा टाकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कऱ्हाड पोलिसांनी कागदपत्रे तपासून साथीदाराकडे कसून चौकशी केली. त्यानंतर अन्य काही टोळ्यांतील साथीदारांकडेही पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी सुरू असल्याचे समजते. (प्रतिनिधी)