प्राथमिक शिक्षक संघाची शकले!

By Admin | Updated: November 28, 2015 00:23 IST2015-11-27T22:46:20+5:302015-11-28T00:23:15+5:30

खंडाळा तालुका : दोन स्वतंत्र गट, तात्त्विक मतभेदाचे कारण

Primary teachers team! | प्राथमिक शिक्षक संघाची शकले!

प्राथमिक शिक्षक संघाची शकले!

खंडाळा : खंडाळा तालुका हा प्राथमिक शिक्षक संघाचा बालेकिल्ला मानला जात होता. या ठिकाणी शिक्षकांची अभेद्य ताकद होती. त्यामुळे जिल्ह्यासह निवडणुकीत तात्विक विचारांचे मतभेद होऊन संघाचे तालुक्यात दोन शकले झाली आहेत. अभेद्य शिक्षक संघात फूट पडून दोन स्वतंत्र संघटना अस्तित्त्वात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्याच्या इतिहासात आता शिक्षकांच्या संघटना पातळीवरील राजकारणाचा नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
खंडाळा तालुक्यातील सर्व शिक्षक हे संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात काम करीत होते. या संघटनेच्या बळावर अनेक समस्यांचे निराकरण करण्यातही यश मिळविले होते. चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या सातारा शिक्षक बँकेच्या निवडणुकीत उमेदवार निवडीवरून संघटनेत ठिणगी पडली आणि त्याचा वणवा संघटना विभागणीपर्यंत पसरला. पूर्वाश्रमीच्या पुरोगामी शिक्षक संघाने तालुका संघटनेवर चालवलेले वर्चस्व, मूळच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक, तालुक्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा या सर्व बाबींवर नाराज होऊन बँकेचे माजी संचालक मच्छिंद्र ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघटनेचे माजी आमदार शिवाजीराव पाटील गटात काम करण्याचा निर्णय घेऊन तालुका पातळीवर नवी संघटना उभी राहात आहे.
खंडाळा तालुक्याची शिक्षक संघटना एकसंध राहावी, यासाठी या संघटनेचे माजी अध्यक्ष बबनराव ठोंबरे, चंद्रकांत यादव, नवनाथ भरगुडे यांनी अनेक वर्षे काम केले. त्यानुसार संघटना पातळीवर उठावदारपणे कामही झाले. मात्र संघटनेच्या निर्णयात इतरांना विचारात न घेणे, लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे या बाबी विशेषत: पुरोगामी शिक्षक संघटनेच्या शिक्षकांचा वाढता प्रभाव या गोष्टींमुळे स्वाभिमानी शिक्षकांनी स्वतंत्र संघटनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षक बँकेचे माजी संचालक मच्छिंद्र ढमाळ, नानासाहेब शेडगे, नवनाथ क्षीरसागर, सुधीर भोसले, राजेश जगताप, विद्याधर क्षीरसागर, नानासो कानडे, दशरथ धायगुडे, संदीप राऊत, रामदास सोळसकर या शिक्षकांच्या नेतृत्वाखाली आमदार शिवाजीराव पाटील प्रणित नवी संघटना उभी राहात आहे. रविवार, दि. २९ रोजी या नव्या संघटनेचे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिवेशन आमदार मकरंद पाटील व माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. त्यामुळे शिक्षक संघाच्या दोन पलटणी निर्माण होणार, हे निश्चित झाले आहे. तर शिक्षक नेते संभाजीराव गटाची धुरा नूतन अध्यक्ष पी. जी. भरगुडे, कार्यकारी अध्यक्ष भानुदास राऊत, दत्तात्रय महांगरे यांनी सांभाळली
आहे. (प्रतिनिधी)

अधिवेशनाच्या उपस्थितीकडे लक्ष
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत संघटनेचे उमेदवार म्हणून भगवान धायगुडे यांनी निवडणूक लढविली होती. तर त्यांच्या विरोधात मूळ संघटनेवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करीत नानासाहेब शेडगे यांनी लढत दिली होती. यात धायगुडे यांना २७४ मते तर शेडगे यांना १८१ मते मिळाली होती. संघटनेत प्रथमच एवढी विभागणी झाली. त्यामुळे अधिवेशनाला कितीजण उपस्थित राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Primary teachers team!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.