जुगार अड्ड्यात सापडली प्रतिष्ठित मंडळी
By Admin | Updated: September 2, 2015 23:25 IST2015-09-02T21:06:24+5:302015-09-02T23:25:31+5:30
केळघर येथे कारवाई : बाराजण अटकेत; रोख रकमेसह दोन लाख नऊ हजारांचा ऐवज जप्त

जुगार अड्ड्यात सापडली प्रतिष्ठित मंडळी
मेढा : केळघर, ता. जावळी येथील बसस्थानकानजीक अवैधपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मेढा पोलिसांनी मंगळवारी रात्री दहा वाजता छापा टाकून बाराजणांना अटक केली. यावेळी रोख रकमेसह सुमारे २ लाख ९ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. अटक केलेल्यांमध्ये तालुक्यातील राजकीय लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्वांना मेढा न्यायालयात हजर केले असता, वैयक्तिक जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळघर येथे अवैध जुगार सुरू असल्याची माहिती मेढा पोलिसांना मिळाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केळघर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्याबाबत काही नागरिकांनी पोलिसांकडे तोंडी स्वरूपात तक्रारीही केल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास मेढ्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी केळघर येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. दरम्यान, या छाप्यात सतीश पार्टे, एजाज कलाल, संतोष पार्टे, सागर कलाल, शांताराम शिर्के, प्रदीप कासुर्डे, संतोष वडार, विजय मानकुमरे, विकास कासुर्डे, संजय बेलोशे, सचिन कासुर्डे व मारुती शेलार या बाराजणांना जुगार खेळताना रंगेहाथ पडकले. पोलिसांनी या बाराजणांना अटक केली आहे. यावेळी पाच दुचाकी व रोक रक्कम नऊ हजार ९० असा एकूण २ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तालुक्यात अवैध व्यवसायाविरुद्ध मेढ्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी केलेल्या कारवाईमुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)
राजकीय वर्तुळात खळबळ
जनतेचे नेतृत्च करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांना जुगारप्रकरणी पकडण्याची ही दुसरी, तिसरी वेळ असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताना काहीनी खोटी नावे सांगितल्याची मेढ्यात चर्चा असून, याप्रकरणी पोलीस शहानिशा करीत आहेत.