‘प्रेशर पंप’ने दुधाचे कॅन, मशिनरीची स्वच्छता
By Admin | Updated: May 20, 2016 00:06 IST2016-05-19T22:41:40+5:302016-05-20T00:06:29+5:30
दूधउत्पाकांमध्ये सजगता : दुधाची भांडी ओल्या कपड्याने पुसून उन्हात सुकविण्याची कल्पना -- लोकमत जलमित्र अभियान

‘प्रेशर पंप’ने दुधाचे कॅन, मशिनरीची स्वच्छता
सातारा : दूध डेअरीमध्ये अत्यंत स्वच्छता ठेवावी लागते. यामध्ये थोडा जरी निष्काळजीपणा केला तरी सर्व दूध खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे डेअरीमध्ये वापरण्यात येणारी मशिनरी, कॅन, गाड्या स्वच्छ धुवाव्या लागतात. यासाठी जास्त पाणी लागत असले तरी सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता डेअरीमालकांनी स्वच्छतेचे विविध उपाय केले आहेत.
दुधाचा दुसऱ्या पदार्थांशी संबंध आला की दूध नासते. त्यामुळे डेअरीचालकांना मोठा तोटा सहन करावा लागतो. यासाठी दूध डेअरीमध्ये कमालीची स्वच्छता ठेवली जाते. परंतु दुधाची हेळसांड होतच असते. याबाबत डेअरीमालक सतर्क झाले असून दूध सांडू नये, याबाबत ते सर्वांना सूचना करत आहेत.
आता गावोगावी दूध संकलन केंद्र सुरू झाली आहे. अशा ठिकाणी दूध संकलित करण्यासाठी वापरण्यात येणारी प्लास्टिकची कॅन स्वच्छ धुतली जातात. पाणीटंचाई लक्षात घेता अनेक डेअरीचालक स्प्रे पंपच्या साह्याने कॅनची स्वच्छता करतात. त्यानंतर ती स्वच्छ कापडाने पुसून उन्हात ठेवतात. यामुळे कॅन चांगले स्वच्छ होतात.
मोठ्या दूध डेअरीमध्ये मशिनरींची स्वच्छता महत्त्वाची असते. वाई येथील तानाजी गाढवे हे कमी पाण्यात स्वच्छता कशी होईल, याकडे लक्ष देत असतात. यासाठी सुरुवातीला ओल्या कापडाने सर्व मशिनरी पुसून घेतली जाते. त्यानंतर हायप्रेशर पंपने पाणी मारले जाते. यामुळे कमी पाणी लागते. (प्रतिनिधी)
स्वच्छताही अन् पाणीबचतही
यंदा उन्हाची तीव्रता जास्त असून पाणीटंचाईचे संकट सर्वांसमोर आहे. दूध चांगले राहण्यासाठी डेअरीची स्वच्छता महत्त्वाचा भाग असतो. मोठ्या मशिनरी, कॅन, दूध वाहतुकीच्या गाड्या स्प्रे पंपने धुतो. त्यामुळे आता पाणी कमी लागत आहे.
- तानाजी गाढवे, गाढवे डेअरी, वाई
दूध खाली सांडू देत नाही
आमच्या भागातील शेतकरी व दूध उत्पादकांकडून आम्ही दुधाचे संकलन करतो. संकलन केंद्रात येणारे दूध कॅनमध्ये साठविले जाते. ती कॅन कमी पाण्यातही चांगली स्वच्छ केलेली असतात. तसेच डेअरीमध्ये दूध खाली सांडणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते.
- दीपक पोळ, माउली दूध संकलन केंद्र, धोम