राष्ट्रपतींकडून श्रीनिवास पाटील यांना राजदंडक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:44+5:302021-02-05T09:14:44+5:30
कऱ्हाड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी राज्यपाल व साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना भारतीय राजमुद्रेने सुशोभित ...

राष्ट्रपतींकडून श्रीनिवास पाटील यांना राजदंडक भेट
कऱ्हाड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी राज्यपाल व साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना भारतीय राजमुद्रेने सुशोभित राजदंडक भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी पत्राद्वारे या शुभेच्छा देताना राज्यपाल म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला आहे.
राष्ट्रपती भवनकडून कऱ्हाडच्या तहसीलदारांना शासकीय कार्यक्रमात पत्र व राजदंडक प्रदान करण्याचे आदेश आले होते. त्यानुसार कऱ्हाड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण समारंभात प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते खासदार श्रीनिवास पाटील यांना पत्र व राजदंडक प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना पाठवलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे की, ‘राज्यपाल म्हणून तुम्ही सिक्कीम राज्याचे सर्वोच्च घटनात्मक पद भूषविले. याची आठवण करून देताना मला आनंद होत आहे. आपण राज्यपालांची संवैधानिक कर्तव्ये पदाच्या सन्मानानुसार पार पाडली. तसेच सिक्कीम राज्यातील लोकांची सेवा आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्राधान्य दिले. केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध दृढ करून आपली संघराज्य रचना मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात आपले अमूल्य योगदान यशस्वीरित्या देऊन आपण आपल्या पदापासून मुक्त झालात. ही माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे.’
दरम्यान, आपल्या राज्यपाल पदाच्या कामाची आठवण ठेवून गणतंत्र दिनी केलेल्या या सन्मानाचा विनम्रतापूर्वक स्वीकार करत खासदार श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आभार मानले आहेत.
फोटो : २९केआरडी०३
कॅप्शन : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांना राजदंडक तसेच शुभेच्छा पत्र देण्यात आले आहे.