वाद घालायला सापडते अध्यक्षांचेच दालन!
By Admin | Updated: October 8, 2015 00:57 IST2015-10-07T21:11:42+5:302015-10-08T00:57:37+5:30
वाद थांबला... मन मोकळे झाले : सोनवलकर--जिल्हा परिषदेतून

वाद घालायला सापडते अध्यक्षांचेच दालन!
सातारा : मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. या पदाचा मान प्रत्येकानेच राखणे अपेक्षित आहे. त्यांच्या दालनात वाद नव्हे, तर संवाद घडणे अपेक्षित आहे. कोरेगाव ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी नेमण्यावरून याच दालनात मंगळवारी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. प्रसंगावधान ओळखून अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी या वादावर पडदा टाकला. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार जिल्ह्याचे निर्णय जिल्ह्यात व्हावेत, हा या हेतूने राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज अस्तित्वात आले. प्रत्येक गावाला आर्थिक स्थैर्य मिळून विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषद हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा मान कायम ठेवणे अपेक्षित असते. मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात ग्रामसेवक संघटना आणि कोरेगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या वादावादीचा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. या चर्चेवेळी अध्यक्षांचे दालन बंद होते. अध्यक्षांना भेटण्यासाठी बाहेर अभ्यागतांची रांग लागली होती. दालनातील वाढलेले आवाज व्हरांड्यात प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांच्या कानावर पडत होते. तब्बल दोन तास हा वाद सुरू होता. बाहेर लोक ताटकळत होते. कोरेगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निधनानंतर या ठिकाणी ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी होत होती. येथे ग्रामपंचायत असली तरी हे मोठे शहर असल्याने ग्रामविकास अधिकाऱ्याअभावी नागरी सुविधेचे तीन-तेरा वाजले होते. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी शिरा ताणून बोलत होते, तर ग्रामविकास अधिकाऱ्यावर ग्रामपंचायत अधिकारी दबाव टाकत असल्याने कुठलाही ग्रामसेवक याठिकाणी जायला तयार नाही, असा युक्तिवाद ग्रामसेवक संघटनेकडून सुरू होता. हा वाद दोन तास चालला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात असा गोंधळ माजणे कितपत योग्य, अशी जोरदार चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
वाद थांबला... मन मोकळे झाले : सोनवलकर--जिल्हा परिषदेतून
कोरेगावात ग्रामविकास अधिकारी नसल्याने गैरसोयी वाढल्या होत्या. नागरी सुविधांचा प्रश्नही निर्माण झाल्याने मी स्वत: या प्रश्नात लक्ष घालण्याचे ठरविले. ग्रामसेवक संघटना व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना एकत्र बसवून चर्चा केल्याशिवाय प्रश्न सुटणार नव्हता, त्यामुळे मी त्यांना बोलावले होते. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कोरेगावचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारीही यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून दबाव येतो व ग्रामविकास अधिकाऱ्यांना काम करताना अडचणी येतात, असा ग्रामसेवक संघटनेचा आरोप होता. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेणे गरजेचे होते. अनेकांनी माझ्यापुढे मन मोकळे केले. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक संघटना यांच्यामध्ये सुवर्णमध्य काढला. यामुळे आता कोरेगाव ग्रामपंचायतीमधील तणाव कमी होईल. कोरेगावसाठी तात्पुरता ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. कामकाज चांगले चालले तर त्याच अधिकाऱ्याला पुढच्या कालावधीसाठी नेमणूक दिली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.