खंडणींचे रेकॉर्डिंग हायकोर्टात सादर
By Admin | Updated: April 28, 2015 23:45 IST2015-04-28T22:41:04+5:302015-04-28T23:45:13+5:30
दत्ता जाधवचा जामीन पुन्हा फेटाळला : बिल्डरच्या कार्यालयातील तोडफोडीचे प्रकरण

खंडणींचे रेकॉर्डिंग हायकोर्टात सादर
सातारा : दत्ता जाधवने बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणीची मागणी केली होती या आरोपाच्या पुष्ट्यर्थ सातारा पोलिसांनी उच्च न्यायालयात एक व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर केले. तसेच त्याच्यावरील पूर्वीच्या गुन्ह्यांची जंत्री सादर केली. त्यानंतर उच्च न्यायालयाने दत्ता जाधवचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला. बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागून त्यासाठी त्याच्या कार्यालयात साथीदारांकरवी तोडफोड केल्याच्या आरोपाखाली दत्ता जाधव सध्या अटकेत आहे. या गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी सातारच्या सत्र न्यायालयात तसेच उच्च न्यायालयातही त्याने दोनदा अर्ज केले. ‘अपूर्वा कन्स्ट्रक्शन’चे मालक हणमंत वलसे, अशोक शिंदे व विजय शिंदे यांना ९६ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावर आहे. वलसे-शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, कन्स्ट्रक्शन कंपनीचे वॉचमन सागर ज्ञानदेव पाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २६ आॅक्टोबर २०१४ रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास ३५ ते ४० जणांनी हत्यारांसह कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याचाही आरोप आहे. कुंपण लोखंडी घणाने तोडून आत घुसलेल्या जमावाने स्टंप, दांडकी वापरून तोडफोड केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. धमकी देऊन जमाव निघून गेला होता.
दरम्यान, सत्र न्यायालयाने दत्ता जाधवचा जामीन अर्ज ३ जानेवारी २०१५ रोजी फेटाळला होता. नंतर त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. दोषारोपपत्र मुदतीत दाखल केल्याने उच्च न्यायालयातील जामीन अर्ज १० फेब्रुवारीला काढून घेतला आणि सत्र न्यायालयात पुन्हा जामीन अर्ज सादर केला. सत्र न्यायालयाने ३ मार्चला तो फेटाळला होता.
त्यानंतर दत्ता जाधवच्या वतीने २३ मार्च रोजी पुन्हा उच्च न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. तपासी अधिकारी रवींद्र पिसाळ यांनी सरकारी वकिलांना गुन्ह्याची माहिती पुरविली. दत्ता जाधव हा हिस्ट्रीसिटर असल्याचे नमूद करून त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यांची माहिती आणि खंडणी मागितल्याबाबतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करण्यात आले. यानंतर उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी पिसाळ यांना सहकार्य केले. (प्रतिनिधी)