तर मुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर करणार
By Admin | Updated: November 24, 2014 23:12 IST2014-11-24T22:03:23+5:302014-11-24T23:12:31+5:30
पिडीत मुलाच्या वडीलांचा इशारा : पत्रकार परिषदेत दिली माहिती

तर मुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर करणार
कऱ्हाड : हिंगनोळे ता़ कऱ्हाड येथील दलित युवक देवदत्त पोपट थोरात यांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर फौसदारी गुन्हा दाखल करा, या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मंगळवारी कऱ्हाड दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मारहाणीचे पुरावे सादर करणार असल्याचा इशारा सेवानिवृत्त पोलिसपाटील पोपट अंतू थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिला़ यावेळी शरद देव, गोरख शिंदे, व्यंकटराव जगताप उपस्थित होते़
थोरात म्हणाले, माझा मुलगा देवदत्त थोरात रात्रीचे काम संपल्यानंतर दूचाकीवरून घरी येत असताना उंब्रज येथे चोरे रोडवरील म्हसोबा मंदिरासमोर त्याला अडवून शिवीगाळ करून, एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याला बेदम मारहाण केली़ तसेच उंब्रज पोलिस ठाण्यात आणल्यावरही त्याला मारहाण झाली़ त्या मारहाणीचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत़
मुलाने कोणताही गुन्हा केला नसताना त्याला मारहाण करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यास कोणी सुपारी दिली होती़
यााबाबत चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अन्यथा आमच्याकडील सर्व पुरावे दि़ २५ नोव्हेंबर रोजी कऱ्हाड दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहे ़ त्यांनीही न्याय न दिल्यास हे सर्व पुरावे प्रसार माध्यामांना देणार आहे़ त्यामुळे संपूर्ण राज्याला व देशातील लोकांनाही पोलीस कर्मचाऱ्यांचे कारनामे दिसतील, असा इशाराही पोपट थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिला़ (प्रतिनिधी)