सातारा जिल्ह्यात मतदान यंत्रणा सज्ज

By Admin | Updated: October 14, 2014 23:25 IST2014-10-14T23:08:41+5:302014-10-14T23:25:17+5:30

८७ उमेदवारांचे नशीब होणार ‘मशीनबंद’

Prepare polling machinery in Satara district | सातारा जिल्ह्यात मतदान यंत्रणा सज्ज

सातारा जिल्ह्यात मतदान यंत्रणा सज्ज

सातारा : जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांत उद्या, बुधवारी मतदान असल्यामुळे आमदारकीसाठी नशीब अजमावणाऱ्या ८७ उमेदवारांचे भवितव्य ‘मशीनबंद’ होणार आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी सायंकाळी एसटी बसने रवाना झाले. यासाठी आवश्यक असणारा बंदोबस्तही समवेत आहे. मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. दरम्यान, मतमोजणी रविवारी (दि. १९) होणार आहे.
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, ८७ उमेदवार आमदारकीसाठी नशीब अजमावत आहेत. फलटणमध्ये १४, वाई १०, कोरेगाव ८, माण १२, कऱ्हाड उत्तर ७, कऱ्हाड दक्षिण १२, पाटण १५, सातारा विधानसभा मतदारसंघात
९ उमेदवार आहेत.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मतपत्रिका त्यांना यापूर्वीच मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या मतपत्रिका संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे जमा केल्या आहेत. १०,१९९ टपाली मतपत्रिका सैनिकांना पाठविण्यात आल्या असून, त्यापैकी ३,४५८ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी रविवारी (दि. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत जेवढ्या मतपत्रिका येतील, त्याच मतदान म्हणून गृहीत धरल्या जाणार आहेत.
आठ आजी... चार माजी...
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत आठ विद्यमान, चार माजी आमदार नशीब अजमावत आहेत. यातील दोघेजण मंत्री होते. जिल्ह्यात २० अतिसंवेदनशील, तर २८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. एकूण २९५० मतदान केंद्रांपैकी २,९२९ मतदान केंदे्र संपर्कक्षेत्रात असून, उर्वरित २१ मतदान केंद्रे संपर्कहीन असल्यामुळे तेथे वायरलेस यंत्रणा कार्यान्वित केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Prepare polling machinery in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.