चव्हाणवाडीत प्रेयसीच्या आतेभावाचा खून
By Admin | Updated: November 6, 2015 23:36 IST2015-11-06T23:35:16+5:302015-11-06T23:36:33+5:30
आरोपी स्वत:च पोलीस ठाण्यात दाखल

चव्हाणवाडीत प्रेयसीच्या आतेभावाचा खून
सणबूर : चव्हाणवाडी-धामणी (ता. पाटण) येथील युवकाने प्रेमसंबंधातून प्रेयसीच्या आतेभावाचा खून केला. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी रक्ताने माखलेल्या कपड्यांसह स्वत:च ढेबेवाडी पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अजित आनंदा देसाई (रा. पापर्डे, ता. पाटण) असे खून झालेल्याचे नाव असून, राहुल रामचंद्र जाधव (रा. चव्हाणवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
चव्हाणवाडीतील राहुल जाधव हा युवक गावातीलच एका ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्याची एका युवतीशी त्याची ओळख झाली.
ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. गेल्या काही दिवसांपासून संबंधित युवती व राहुल मोबाइलवर एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान, युवतीच्या मैत्रिणीने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. मैत्रिणीच्या वडिलांनी ही माहिती युवतीच्या वडिलांना दिली. त्यामुळे युवतीच्या वडिलांनी तिच्या आत्याचा मुलगा राहुल जाधव याला घरी बोलावून घेतले. सर्व प्रकार त्यांनी त्याला सांगितला. त्यामुळे राहुलसह त्या युवतीचे वडील व चुलतभाऊ राहुलला मारहाण करण्यासाठी त्याचा शोध घेत होते. हा प्रकार समजल्यानंतर घाबरलेला राहुल त्याच्या शेतातील एका गंजीचा आडोसा घेऊन लपून बसला. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच ठिकाणी झोपत होता.
गुरूवारी सकाळी संबंधित मुलगी व तिची मैत्रिण अजितच्या दुचाकीवरून कॉलेजला गेल्याचे राहुलने पाहिले होते. त्यामुळे तो चिडला होती. तसेच अजित आपल्याला मारहाण करेल, याचीही त्याला भीती होती. शुक्रवारी सकाळी अजित युवतीला महाविद्यालयात सोडून दुचाकीवरून एकटाच परत येत होता. त्यावेळी आडोशाला लपून बसलेल्या राहुलने अचानक अजितवर हल्ला चढविला. त्याने त्याला दांडक्याने मारहाण केली. तसेच मोठा दगड उचलून तो दोन ते तीन वेळा त्याच्या डोक्यात घातला. त्यामुळे अजितचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर काही वेळानंतर राहुल स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसांत झाली आहे. पोलीस उपअधीक्षक नीता पडवी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सहायक पोलीस निरीक्षक चौखंडे तपास करीत आहेत. (वार्ताहर)
मोबाइल फोडून विहिरीत फेकला
अजितचा खून केल्यानंतर राहुलने त्याची दुचाकी शेतात टाकली. त्यानंतर तो शेतातील पायवाटेवरून चालत एका विहिरीजवळ आला. तेथे स्वत:चा मोबाइल फोडून त्याने तो विहिरीत फेकून दिला. कपड्यांवरील रक्ताचे डाग कोणाला दिसू नयेत, यासाठी टॉवेल अंगावर घेऊन तो पोलीस ठाण्याच्या दिशेने गेल्याचे तपासात उघड झाले आहे.