महाविद्यालयात गर्दी टाळायला ऑनलाइनला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:44 IST2021-08-17T04:44:58+5:302021-08-17T04:44:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना थेट बोलविण्यापेक्षा ...

Prefer online to avoid crowds in college | महाविद्यालयात गर्दी टाळायला ऑनलाइनला प्राधान्य द्या

महाविद्यालयात गर्दी टाळायला ऑनलाइनला प्राधान्य द्या

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना थेट बोलविण्यापेक्षा बुधवार, दि. १८ ऑगस्टपासून ऑनलाइन प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिक्षण उपसंचालक स. ध. सोनवणे यांनी केले आहे. ७ सप्टेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार असून, ते प्रत्यक्ष की ऑनलाइन याबाबत स्पष्टता नाही.

कोल्हापूर विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सातारा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील शिक्षणाधिकाऱ्यांना अकरावी प्रवेशाबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अकरावीची प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून (दि. १८) सुरू करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज व संबंधित कागदपत्रे घेऊन प्रवेश निश्चित करावा. आवश्यक शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारावे. ज्यांना ऑनलाइन प्रवेश घेणे शक्य नाही त्यांनी अंतराचे निकष व शासनाने कोविड-१९बाबत घालून दिलेले निकष पाळून टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना बोलावून प्रवेश द्यावेत. यावेळी महाविद्यालयात गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच अनुदानित तुकड्यांतील वाढीव विद्यार्थी क्षमतापूर्ण झाल्यानंतरच क्रमाने विनाअनुदानित तुकड्यांमधील प्रवेश क्षमता पूर्ण करण्याचे सुचित केले आहे. अकरावी प्रवेशापासून कोणीही वंचित राहू नये याचीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. मंजूर क्षमतेपेक्षा जादा प्रवेश दिल्याने परिसरातील मंजूर तुकड्यांवर अनिष्ट परिणाम होणार नाहीत याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे.

चौकट

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

१८ ते २३ ऑगस्ट : फार्म देणे व स्वीकारणे

२४ ते २६ ऑगस्ट : अर्ज छाननी, तपासणी, निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करणे

२७ ऑगस्ट : दुपारी ३ पर्यंत निवड यादी व प्रतीक्षा यादी सूचना फलकावर लावणे

२८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर : निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे

२ ते ३ सप्टेंबर : प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देणे

४ ते ६ सप्टेंबर : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन प्रक्रिया पूर्ण करणे.

ऑनलाइन का ऑफलाइन याबाबत स्पष्टता नाही!

अकरावीची प्रवेशप्रक्रिया १८ ऑगस्टला सुरू होऊन ६ सप्टेंबरला संपणार आहे. मंगळवार, दि. ७ सप्टेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र हे वर्ग ऑनलाइन होणार की ऑफलाइन याविषयी अद्याप स्पष्टता नाही. पुढील काही दिवस कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासन निर्णय प्राप्त झाल्यानंतर मगच प्रत्यक्ष वर्ग की ऑनलाइन वर्ग याबाबत सुचित करण्यात येणार आहे.

.............

Web Title: Prefer online to avoid crowds in college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.