जिल्ह्यात माॅन्सूनपूर्वचा तडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:52+5:302021-06-04T04:29:52+5:30
सातारा : जिल्ह्यात बुधवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी माॅन्सूनपूर्व पावसाने तडाका दिला. यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर बुधवारच्या ...

जिल्ह्यात माॅन्सूनपूर्वचा तडाका
सातारा : जिल्ह्यात बुधवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी माॅन्सूनपूर्व पावसाने तडाका दिला. यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर बुधवारच्या पावसात जावळी तालुक्यात पुलाचा भराव वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली, तर सातारा शहरात बुधवारी मध्यरात्रीपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता.
जिल्ह्यातील वातावरण मागील काही दिवसांपासून बदलत चालले आहे. कमाल तापमान ३५ अंशाखाली आली असल्याने माॅन्सूनची चाहूल लागली आहे. तर सतत ढगाळ व पावसाळी वातावरण निर्माण होत आहे. त्यातच सहा दिवसांपासून जिल्ह्यात माॅन्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. बुधवारी दुपारनंतर तर जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली.
माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरात पहिल्यांदाच यंदा चांगला पाऊस झाला. पण, या पावसामुळे उन्हाळी पिके कोलमडून पडली. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यातच काही शेतकऱ्यांचा उन्हाळी भुईमूग काढणीच्या टप्प्यात आला आहे. पावसामुळे शेंगा उगवण्याची भीती निर्माण झाली आहे.
जावळी तालुक्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मामुर्डी येथे मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील पुलाचा भराव वाहून गेला. यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती.
दरम्यान, गुरुवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तसेच आभाळही भरून आलेले. मात्र, दुपारच्या सुमारास सूर्यदर्शन झाले. सायंकाळच्या सुमारास मात्र पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले होते.
फोटो दि.०३सातारा पाऊस नुकसान फोटो...
फोटो ओळ : माण तालुक्यात माॅन्सूनपूर्व पाऊस आणि वाऱ्याने उन्हाळी पिके भुईसपाट झाली आहेत.
...................................................