प्रतापसिंह महाराजांचे चरित्र जगासमोर येण्याची गरज
By Admin | Updated: January 19, 2015 00:21 IST2015-01-18T22:31:58+5:302015-01-19T00:21:54+5:30
दत्तप्रसाद दाभोलकर : प्रतापसिंह महाराज स्मृती पुरस्काराचे वितरण

प्रतापसिंह महाराजांचे चरित्र जगासमोर येण्याची गरज
सातारा : ‘सातारचे प्रतापसिंह महाराज अनेक कारणांनी मोठे होते. त्यांचे चरित्र विविध भाषामधून आणने काळाची गरज आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी केले. प्रतापसिंह महाराजांच्या २२२ व्या जयंतीनिमित्त सातारा नगरपरिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले. यानिमित्त ‘श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृती’ पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संभाजीराव पाटणे, नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख, अमोल मोहिते, हेमा तपासे, मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते.पुरस्काराला उत्तर देताना दाभोलकर म्हणाले, ‘पुरस्कार देशपातळीवरीलही मिळतात; पण घरच्या माणसांनी पाठीवर टाकलेली शाबासकीची थाप जबाबदारीची जाणीव करून देत असते. त्यामुळे सातारा पालिकेतर्फे ‘प्रतापसिंह महाराज स्मृती’ पुरस्कार दिल्याने मला माझ्या जबाबदारीत आणखी भर घातली आहे. ज्यांच्या नावाने पुरस्कार दिला गेला ते प्रतापसिंह महाराज अनेक कारणांनी मोठे होते. त्यांच्याबद्दल इंग्रजांमध्येही आदर होता. त्यांचे चरित्र जगासमोर येणे गरजेचे आहे. या चरित्राचे हिंदी, इंग्रजीतूनही भाषांतर झाल्यास ते जगासमोर जाणार आहे.
इंग्रजांनी सर्वांना छळले असताना केवळ सातारा जिल्ह्यातच प्रतिसरकार निर्माण होऊ शकले. जीवन विमा महामंडळ, रयत शिक्षण संस्थांसारखे अनेक अमूल्य ठेवा साताराने राज्याला, देशाला दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.’ (प्रतिनिधी)