प्रतापरावांचे सुपुत्र भगवा झेंडा घेणार !

By Admin | Updated: August 26, 2014 21:52 IST2014-08-26T20:34:57+5:302014-08-26T21:52:09+5:30

मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर बंदूक कशाला..?

Prataprao's son will take a saffron flag! | प्रतापरावांचे सुपुत्र भगवा झेंडा घेणार !

प्रतापरावांचे सुपुत्र भगवा झेंडा घेणार !

वाई विधानसभा : ‘दादांचा नवा डाव भाऊंना रुचणार का?’.. कॉँग्रेसच्या जुन्या निष्ठावतांना आश्चर्याचा धक्का
सातारा : प्रतापराव भोसले यांनी राजकारणात आपली प्रतिमा कायम जपली. आजही ते काँग्रेस विचारांना सोडून कधी वागल्याचे कोणाच्या ऐकिवात नाही. दिल्लीच्या राजकीय पटलावर आणि अनेक चर्चांमध्ये आजही त्यांच्या नावाचा उल्लेख आदराने केल्याचा अनेकजण सांगतात. अशावेळी त्यांचे सुपूत्र मदन भोसले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत हाती ‘भगवा झेंडा’ घेऊनच सामोरे जाण्याचे संकेत दिले आहेत.
‘विधानसभा निवडणूक लढणार मात्र, आघाडीकडून नाही,’ असे सूचक वक्तव्य ‘संवाद’ मेळाव्यात करून त्यांनी राजकारणातील नवा डाव मांडला आहे. मात्र, काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना आणि दस्तुरखुद्द प्रतापराव भोसलेंना हा निर्णय रुचणार का, याचीच चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे.
वाई विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात लक्षवेधी मानला जातो. येथील ‘भोसले-पाटील’ यांच्यातील परंपरागत संघर्ष गेली सोळा वर्षे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राने पाहिला आहे. अर्थातच आजही तो सुरू आहे. कधीकाळी प्रतापराव भोसले आणि लक्ष्मणराव पाटील यांनी खांद्याला खांदा लावून राजकारण केले, मात्र राजकीय सत्तासंघर्षात दोघेही एकमेकांचे राजकीय वैरी बनले. हेच राजकीय वैर त्यांच्या पुढच्या पिढीतही आले आणि आमदारकी असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांची कोणतीही निवडणूक असो, प्रत्येकवेळी ते दिसून आले आहे. २००४ च्या निवडणुकीनंतर सुरु झालेला हा संघर्ष आजही कायम आहे. आगामी विधानसभेलाही तो दिसणार याविषयीही कोणाच्या मनात दुमत नाही. दिल्लीच्या राजकीय पटलावर आणि अनेक चर्चांमध्ये आजही प्रतापराव भोसले यांच्या नावाचा उल्लेख आदराने केल्याचा अनेकजण सांगतात. मात्र, संधी असतानाही मदन भोसलेंना असे वलय कधीच प्राप्त करता आले नाही, ही बाबदेखील तितकीच खरी आहे. मदन भोसले माजी आमदार अथवा ‘किसन वीर’चे अध्यक्ष असण्यापेक्षा ते प्रतापराव भोसले यांचे सुपूत्र आहेत, हीराजकारणातील त्यांची मोठी ओळख आहे.
प्रतापराव भोसले यांनी वेळोवेळी शरद पवारांशी संघर्ष केला. अनेकदा त्यांना पवारांशी जुळवून घ्या, असे निरोप आले, मात्र त्यांनी आपला ‘सातारी बाणा’ कधी सोडला नाही. त्याची राजकीय किमंत त्यांना चुकवावी लागली असली तरी त्यांनी आपला पवार विरोधी बाणा कधी सोडला नाही. असा करारी बाणा कधी मदन भोसले यांच्याकडे पाहण्यास मिळाला नाही आणि यापुढील काळातही तो कधी पाहायला मिळेल की नाही, याची चर्चा रंगते.मदन भोसले यांनी काही वर्षांपूर्वी कारखाना कार्यस्थळावर आ. विलासराव उंडाळकर, माजी आ. चिमणराव कदम त्याचबरोबर काँग्रेसची सर्व मंडळी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. नेमकी हीच बाब ‘बाबा गट’ त्यांच्यापासून दुरावण्यास कारणीभूत ठरली. परिणामी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्यातही मदन भोसलेंचा वावर कमी झाला. मदन भोसले यांच्याकडे आजमितीस तीन साखर कारखाने असले तरी त्यांनी काँग्रेस वाढीसाठी अथवा स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी कधी संघर्ष केल्याचे ऐकिवात नाही. त्यांच्यासमवेत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मात्र नेहमीच संघर्ष केल्याचा इतिहास आहे. त्यातच कारखान्याच्या ‘बंद केबिन’मध्ये सतत व्यस्त असणाऱ्या मदन भोसले यांच्या जनसंपर्काविषयी खुद्द काँग्रेसचेच कार्यकर्ते नेहमी शंका उपस्थित करतात. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर बंदूक कशाला..?
मुंबईत काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. गतवेळी जिल्ह्यातील जे मतदारसंघ काँग्रेसकडे होते, तेथील उमेदवारांनाही अर्ज भरण्याचे सांगून मुलाखतीला बोलाविले. ‘वाई’ काँग्रेसकडे होता. मदन भोसले मुलाखतीला आलेच नाहीत. उलटपक्षी त्यांचे नेतृत्व मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी ‘वाईमधून मुख्यमंत्र्यांनील लढावे,’ अशी ‘गुगली’ टाकून पक्षालाच ‘पायचित’ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ‘जर मुख्यमंत्री वाईतून लढणार नसतील तर कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे भगवा झेंडा हातात घेऊ,’ अशी घोषणा मदन भोसले यांनी केली. त्यामुळे उलट काँग्रेसचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. ‘आयुष्यभर काँग्रेसला मोठे करणाऱ्या नेत्याच्या सुपूत्राने हातात भगवा घ्यायचा असेल तर आढेवेढे न घेता घ्यावा. विनाकारण मुख्यंमत्र्यांच्या खांद्यावर बंदूक का ठेवून कशाला ?’ अशीही विचारणा कार्यकर्ते करू लागले आहेत.

Web Title: Prataprao's son will take a saffron flag!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.