सातारा : सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेला किसन वीर सहकारी साखर कारखाना प्रतापगड आणि खंडाळा साखर कारखान्यांच्या ओझ्यामुळे अडचणीत आल्याची चर्चा शेतकरी सभासदांमध्ये आहे. या कारखान्यांचं ओझं वेळीच उतरवून कारखाना चालवला गेला तर या अडचणी निश्चितपणे दूर होतील, असा विश्वास साखर उद्योगाचा अभ्यास असलेले शेतकरी व्यक्त करत आहेत.
किसन वीर साखर कारखाना पाच तालुक्यांतील ऊस क्षेत्राच्या जोरावर चांगला चालला असतानाच कारखान्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला जावळी तालुक्यातील सोनगावच्या माळावरचा प्रतापगड सहकारी साखर कारखाना चालवायला घेतला. या कारखान्याला ५६ कोटी रुपये देऊन १६ वर्षांच्या करारावर हा कारखाना चालवायला घेतला आहे. सन २०१२-१३ मध्ये हा कारखाना ‘किसन वीर’ ने चालवायला घेतला. दिवंगत आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला प्रतापगड कारखाना अडचणीत सापडलेला असताना किसन वीर कारखाना मदतीला धावला. त्या कारखान्याच्या सभासदांचे नुकसान टळले. मात्र, या कारखान्याचा आर्थिक भार हा किसन वीर कारखान्यावर पडलेला आहे.
प्रतापगड चालवायला घेतला त्याला आठ वर्षे पूर्ण झालेली आहेत. हा कारखाना आणखी आठ वर्षे चालवायचा ठरविल्यास किसन वीर साखर कारखान्याचे कर्ज वाढण्याची भीती सभासद, शेतकरी व्यक्त करत आहेत. किसन वीर कारखान्याने प्रतापगड कारखान्यात अडकलेले हात सोडवून घेणे आवश्यक आहे. तरच किसन वीर कारखान्याला दिलासा मिळेल, असे मत हे शेतकरी सभासद व्यक्त करतात.
दरम्यान, खंडाळा साखर कारखान्यालाही त्या तालुक्यातून अपेक्षित भाग भांडवल जमा करता आलेले नाही. या कारखान्यात देखील किसन वीर कारखान्याने पैसे घातले आहेत. या कारखान्याच्या उभारणीसाठी २४० कोटी रुपये खर्च झालेला आहे. खंडाळा कारखान्यासाठी ९० कोटी रुपयांचे भागभांडवल अपेक्षित होते. त्यासाठी किसन वीर कारखाना ४५ कोटी जमा करणार होता. तर उर्वरित ४५ कोटी खंडाळा कारखान्याने भागभांडवल गोळा करायचे होते. त्यापैकी केवळ १५ कोटी रुपये भागभांडवल खंडाळा कारखान्याला गोळा करता आले. खंडाळा कारखान्याकडून किसन वीर कारखान्याला ९६ कोटी रुपयांचे येणे आहे. कारखान्याने बँकांकडून व्याजाने पैसे घेऊन खंडाळा कारखान्याला मदत केली होती. त्याचे व्याज सुरुच आहे.
खंडाळा आणि प्रतापगड या दोन्ही कारखान्यांचा व्यवहार मिटवून किसन वीर कारखाना स्वबळावर चालवायचा निश्चित केल्यास कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारु शकते, असे सभासदांचे म्हणणे आहे.
चौकट..
सभासदांच्या ठेवींसाठी न्यायालयीन लढा
किसन वीर साखर कारखान्याच्या सभासदांच्या ४२ कोटी रुपयांच्या ठेवी भाग भांडवलात वर्ग करण्यात आल्या होत्या. सहकार कायद्यानुसार कारखाना जर अडचणीत आला तर या ठेवींमधूनच सभासदांना मदत करता येणे शक्य असते. मात्र या ठेवींना व्याज द्यावे लागत असल्याने कारखाना संचालक मंडळाने या ठेवी भाग भांडवलात वर्ग केल्या. यावर कारखान्याचे सभासद बाबूराव शिंदे आणि राजेंद्र शेलार यांनी कारखान्याच्या विद्यमान संचालकांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या लढ्यानंतर कारखान्याने सभासदांच्या ४२ कोटींच्या ठेवी पुन्हा पूर्ववत केल्या होत्या. कारखान्याने आपले भागभांडवल पुन्हा ९२ कोटींवर नेले.
चौकट...
डिस्टिलरी बंद...कर्जाचे व्याज सुरु
कारखान्यामध्ये को-जनरेशन प्लॅन्ट, सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प, तीन डिस्टिलरी, इथेनॉल असे अनेक आधुनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मात्र हे उभे करत असताना कारखान्यावर मोठे कर्ज झाले. ज्या डिस्टिलरीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, त्यासाठी बँकेकडून कर्ज उचलले त्याचे व्याज चालू आहे. मात्र डिस्टिलरी बंद असल्याचे सभासदांचे म्हणणे आहे. कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस आहे. कारखान्याने क्रशिंग क्षमता वाढवून पहिल्यांदा कार्यक्षेत्रातील सगळा ऊस गाळप करण्यावर लक्ष केंद्रित करावं, अशी इच्छा सभासद व्यक्त करतात. तसेच कारखान्यामध्ये बाय प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतील तर शेतकऱ्यांचा उसाला इतर कारखान्यांच्या तुलनेत चांगला दर का मिळत नाही? असा सवाल देखील विचारला जात आहे.
लोगो : गाथा किसन वीर
भाग ३