प्रतापगड कारखाना भविष्यात स्वबळावर चालवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:35 IST2021-02-07T04:35:43+5:302021-02-07T04:35:43+5:30
कुडाळ : किसन वीर साखर कारखान्याने सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना करारावर चालविण्यासाठी घेतला होता. कारखाना भागीदारी करार ...

प्रतापगड कारखाना भविष्यात स्वबळावर चालवणार
कुडाळ : किसन वीर साखर कारखान्याने सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना करारावर चालविण्यासाठी घेतला होता. कारखाना भागीदारी करार करून सहकारात टिकविण्याचे काम केले. सद्यस्थितीत किसन वीर कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळली असून प्रतापगड कारखाना चालविण्याचा मूळ हेतूच साध्य होत नाही. यामुळे हा करार रद्द करण्याचा निर्णय प्रतापगड संचालक मंडळाने घेतला असून याबाबत साखर आयुक्तांकडे लवादाची नोटीस दाखल केली आहे,’ अशी माहिती संचालक व जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे दिली.
यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र फरांदे, बाळासाहेब निकम, मालोजीराव शिंदे, प्रकाश भोसले व प्रदीप तरडे उपस्थित होते.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, २०१२-१३ मध्ये प्रतापगड सहकारी साखर व किसन वीर सहकारी साखर कारखान्याबरोबर भागीदारी करार केला होता. किसन वीर कारखान्याकडून सुरुवातीस प्रतापगड कारखाना हा पूर्ण क्षमतेने चालविण्याचा प्रयत्नही केला. परंतु सध्या किसनवीर कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याने मागील पाच वर्षांत तीन गळीत हंगाम हा प्रतापगड कारखाना बंद ठेवण्यात आला. कारखान्याच्या कामगारांना पंधरा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कमही भरलेली नाही. मागील गळीत हंगामातील शेतकऱ्यांची बारा महिने बिले दिले नाहीत. तसेच काराराची कोणतीही पूर्तता झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारखान्याची प्रॉपर्टी ॲक्ट रद्द करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते. यामुळे किसन वीर कारखान्याकडून प्रतापगड कारखान्याशी असणारा करार मोडावा. प्रतापगड व्यवस्थापन आणि शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे चालवला जाईल. तसेच किसन वीर कारखाना व्यवस्थापनानाने सामंजस्याने प्रतापगडचा करार संपुष्टात आणावा, असे आवाहनही प्रतापगड संचालक मंडळाने केले आहे.
चौकट :
तालुक्यातील शेतकऱ्यांचा फायदा
प्रतापगड स्वबळावर सुरू झाल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. सर्व कायदेशीर पूर्तता करून प्रतापगड व्यवस्थापन कारखाना आपल्या ताब्यात घेऊन येणारा गळीत हंगाम यशस्वी करणार आहे. सभासद आणि शेतकऱ्यांचा विचार करून स्वबळावर कारखाना चालवणे हा प्रतापगड संचालक मंडळाने निर्णय घेतल्यामुळे कामगारांचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल.