प्रीतिसंगम बागेला मिळणार झळाळी

By Admin | Updated: April 11, 2016 00:50 IST2016-04-10T22:24:47+5:302016-04-11T00:50:12+5:30

कामास प्रारंभ : तीन कोटी खर्चातून नूतनीकरणाचे काम; दर्जेदार सुविधा निर्माण होणार

Prakash Sangamam will get a light in the garden | प्रीतिसंगम बागेला मिळणार झळाळी

प्रीतिसंगम बागेला मिळणार झळाळी

कऱ्हाड : शहरात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक उद्यानामुळे शहरातील सौंदर्यातही भर पडते. तर नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून उद्यानाकडे पाहिले जाते. याच हेतूने यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळालगत पालिकेच्या वतीने ३२ वर्षांपूर्वी स्वामीबाग उभारण्यात आली. या बागेच्या नूतनीकरणाचे काम पालिकेच्या वतीने सध्या हाती घेण्यात आले आहे.
सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून बागेत अनेक दर्जेदार सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यामुळे नूतनीकरणानंतर आता या बागेला नवीन झळाळी निर्माण होणार आहे.
कऱ्हाड पालिकतर्फे शहरातील चार ठिकाणी नागरिकांसाठी व चिमुकल्यांसाठी उद्याने उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावर ‘स्वामीबाग’, सावरकर पुतळा परिसरात ‘नाना-नानी पार्क’, सुपरमार्केट परिसरात ‘पी. डी. पाटील’ उद्यान तर यशवंतराव
चव्हाण स्मृतिसदन परिसरातील उद्यान
अशा चार ठिकाणी विविध फुलझाडांसह आकर्षक खेळण्यांची उद्याने उभारण्यात आली आहेत.
पी. डी. पाटील यांच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ परिसरामध्ये १९८४ मध्ये ‘प्रीतिसंगम’ बाग उभारण्यात आली. या बागेला सुमारे ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, त्याच्या देखभाल व दुरुस्तीला पालिकेचा कमीच खर्च लागतो. तर दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवीवर्षाअंतर्गत शंभर कोटी निधीतून पालिकेला तीन कोटी निधी उपलब्ध करून दिला. त्यातून या स्वामीबागेचे नूतनीकरण केले जात आहे.
३२ वर्षांनंतरही बागेत बदल करण्याची गरज नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. मात्र, बागेतील असलेल्या गवताच्या लॉनचे मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांमुळे व मुंग्यांमुळे नुकसान झाले आहे.
तर दुसरीकडे लहान मुलांच्या खेळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गार्डनमधील खेळण्यांचीही मोडतोड झालेली आहे.
त्याठिकाणीही नव्याने खेळण्यांचे साहित्य बसविण्यात येणार
आहे.
नव्याने नूतनीकरण करण्यात येत असलेला बागेच्या ठिकाणी मूळचा बागेचा ढाचा तसाच ठेवला जाणार आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, बागेत गवताचे लॉन, मातीचे लॉन, आकर्षक फुलझाडे, पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर, एलईडी बल्बाद्वारे आकर्षक विद्युत रोषणाई अशा सुविधा बागेत उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे कऱ्हाडमधील ही बाग अधिक चांगली होणार आहे. कऱ्हाडकरांचे पाय इकडे वळणार आहेत. (प्रतिनिधी)

बत्तीस वर्षांपूर्वीची बाग
कऱ्हाड येथे अनेक वर्षांपासूनची व आजही चांगल्या स्थितीत असलेली अनेक ठिकाणे आहेत. त्यामधील एक ही यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसरातील ‘स्वामीबाग’ आहे. १९८४ मध्ये बांधण्यात आलेल्या बागेला सध्या बत्तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्या बागेच्या नूतनीकरणास सध्या सुरुवात करण्यात आलेली आहे.

Web Title: Prakash Sangamam will get a light in the garden