प्रकाश आमटे यांना ‘दादा उंडाळकर’ पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: February 8, 2015 00:53 IST2015-02-08T00:50:46+5:302015-02-08T00:53:08+5:30
उंडाळेत दि. १७ व १८ रोजी भरगच्च कार्यक्रम

प्रकाश आमटे यांना ‘दादा उंडाळकर’ पुरस्कार जाहीर
कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक’ पुरस्कार यंदा सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांना देण्यात येणार असल्याची माहिती समितीचे व्यवस्थापकीय विश्वस्त प. ता. थोरात व रयत कारखान्याचे अध्यक्ष जयसिंगराव पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. रोख ५१ हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या ४१ व्या स्मृतिदिनी दि. १८ रोजी होणाऱ्या ३२ व्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशनात डॉ. आमटे यांना या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यापूर्वी स्वातंत्र्यसेनानी ना. ग. गोरे, उषा मेहता, गोविंदभाई श्रॉफ, निर्मलाताई देशपांडे, ग. प्र. प्रधान, प्रभारकराव कुंटे, साहित्यिक ना. धो. महानोर, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, अण्णा हजारे, आचार्य शांताराम गरुड, प्राचार्य पी. बी. पाटील, डॉ. अभय बंग, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, कृषितज्ज्ञ डॉ. जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, अॅड. उज्ज्वल निकम, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लाहने, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, नीळकंठ रथ, डॉ. सदानंद मोरे यांना गौरविण्यात आले आहे. या व्यासपीठावर देशभरातील दिग्गजांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. यामध्ये स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली, अच्युतराव पटवर्धन, शंकर दयाळ शर्मा, तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)