लोणंद : तब्बल ४८० किलोमीटर दुचाकीवरुन अवघ्या सतरा तासांत प्रवास करुन अष्टविनायक दर्शन घेण्याचा विक्रम लोणंदमधील प्राजक्ता घोडके हिने केला आहे. या दरम्यान तिने ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा संदेश देत मुलींपुढे आदर्श प्रस्थापित केला आहे.प्राजक्ताने या मोहिमेस शुक्रवारी पहाटे साडेपाचला मोरगावपासून सुरूवात केली. अष्टविनायकातील शेवटचा गणपती पाली येथे रात्री साडेनऊ वाजता पोहोचून पूर्ण केला. यासाठी सतरा तास ४८० किलोमीटरचा अखंड प्रवास एकटीने पूर्ण केला. याची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद घेणार आहे. या मोहिमेसाठी प्राजक्ताला एव्हरेस्टवीर प्रजित परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी नगरसेविका दिपाली शेळके, ज्योती डोणीकर, राजश्री शेळके, स्मिता काळे, अनुराधा कुलकर्णी, डॉ. अनिलराजे निंबाळकर, प्राजित परदेशी, सागर गालिंदे, आशितोष घोडके उपस्थित होते. मोहिमेबाबत लोणंद येथील राजमाता अहिल्या देवी स्मारकाच्या समोर सायंकाळी साडेपाचला फटाक्यांची आतिषबाजी करत सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा मधुमती गालिंदे यांनी तिला शाल-श्रीफळ देऊन तिचा सत्कार केला.प्राजक्ताचे वडील बँकेत सेवक पदावर कार्यरत असून प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुला-मुलीला उच्च शिक्षण दिले. प्राजक्ता सध्या बेंगलोर येथे आयटी कंपनीत नोकरी करते. यापूर्वीही तिने ग्रुपमध्ये सहाशे किलोमीटरचा दुचाकीवरुन प्रवास केला आहे. लोणंदसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहीलेली प्राजक्ता नोकरी करत अशा प्रकारच्या धाडसी मोहिमा यशस्वी करुन सामाजिक संदेश देत आहे.
दुचाकीवरुन 'ती'ने सतरा तासांत केले अष्टविनायक दर्शन, दिला 'बेटी बचाओ; बेटी पढाओ'चा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 20:21 IST